![]()
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तीन दिवसीय १९ वी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा सुरू झाली आहे. अंतिम फेरीसाठी यंदा ९२८ प्रकल्प पात्र ठरले आहेत. मागील वर्षापेक्षा ही संख्या २२९ ने वाढली आहे. विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात स्पर्धेचे उद्घाटन झाले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू प्रा. पराग काळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत आहे. आविष्कार समितीचे अध्यक्ष देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आयक्यूएसी) संचालक डॉ. विनायक जोशी यांच्या समन्वयाने आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. यंदा विभागीय स्तरावर जवळपास ५,००० प्रकल्पांमधून सुमारे १०,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मागील वर्षी ३,६०१ प्रकल्प सादर झाले होते आणि सुमारे ७,००० विद्यार्थी सहभागी झाले होते. यंदा प्रकल्पांची संख्या जवळपास ३९ टक्के, तर विद्यार्थी सहभाग सुमारे ४३ टक्के वाढला. मागील वर्षी विभागीय स्पर्धा ११ ठिकाणी झाली होती. यंदा ती १८ केंद्रांवर घेण्यात आली. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील अधिक महाविद्यालये आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या नियोजनासाठी विद्यापीठाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी एआरसी समन्वयकांची कार्यशाळा घेतली. त्यात ४८१ समन्वयक सहभागी झाले. त्यांना स्पर्धेचे नियम, नियोजन, प्रकल्प नोंदणी आणि आयोजनाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आविष्कार स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच परीक्षक आणि तज्ज्ञांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक विभागांतील जवळपास २०० तज्ज्ञांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी सुमारे १५० तज्ज्ञ २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. मागील वर्षी विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी ६९९ प्रकल्प पात्र ठरले होते. यंदा ९२८ प्रकल्प अंतिम फेरीत पोहोचले. ही सुमारे ३२.८ टक्क्यांची वाढ आहे.
Source link
आविष्कार स्पर्धेच्या अंतिम फेरीत 928 प्रकल्प:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 19 वी स्पर्धा; मागील वर्षापेक्षा 229 प्रकल्पांची वाढ