![]()
फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमण आणि पथारी व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या पुणे शहर शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. ना. गोपाळकृष्ण गोखले पथ अर्थात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर अनधिकृत पथारी व्यवसाय वाढले आहेत. त्यामुळे पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुणे महानगरपालिकेने अलीकडेच या रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांवर कारवाई केली होती. मात्र, केवळ अतिक्रमण हटवणे पुरेसे नसून या व्यवसायांमागील यंत्रणेचीही तपासणी करावी, अशी भूमिका भाजपच्या शिष्टमंडळाने मांडली. महापालिकेच्या सभागृहात भाजप नगरसेवकांनी यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेदरम्यान परिसरात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हा विषय शहराच्या सुरक्षिततेशीही संबंधित असल्याचे शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना सांगितले. पथारी व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कामगारांची ओळख, वास्तव्याची कागदपत्रे आणि नागरिकत्व तपासावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. कागदपत्रांत अनियमितता आढळल्यास किंवा कोणी बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचे निष्पन्न झाल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, असेही म्हटले आहे. शिक्षण, उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील केंद्र म्हणून पुण्यात देशभरातून नागरिक शिक्षण आणि रोजगारासाठी येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. धर्म, भाषा किंवा प्रांताच्या आधारावर नव्हे, तर कायदेशीर कागदपत्रे आणि वस्तुनिष्ठ तपासणीच्या आधारे कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना त्रास आणि सार्वजनिक जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वय साधून अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी, अशी अपेक्षा भाजपच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. या शिष्टमंडळामध्ये भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस सुशील मेंगडे, राघवेंद्र बापू मानकर, दीपक पोटे, नगरसेवक रविंद्र साळेगावकर, प्रियांका शेंडगे, पूजा जागडे, निवेदिता एकबोटे, अमृता मेहेत्रे, अजय खेडेकर,अमर आवळे,राजाभाऊ बराटे, सुनील पांडे आणि पुष्कर तुळजापूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुणे शहराचा विकास, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी प्रशासनाने अशा संवेदनशील विषयांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित पुण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या भेटीद्वारे करण्यात आली.
Source link
भाजपने फर्ग्युसन रस्त्यावरील कामगारांची चौकशी मागितली:पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन; ओळख, वास्तव्याची कागदपत्रे आणि नागरिकत्व तपासण्याची मागणी