![]()
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २६) पुण्यातील ज्ञानमंडपम येथील भाऊसाहेब चितळे सभागृहात हे संमेलन होईल, अशी माहिती विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. नितीन करमाळकर यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन होणार आहे. हे ठिकाण एस. पी. कॉलेज मैदानाजवळ आहे. पत्रकार परिषदेला विज्ञान भारतीचे सचिव कौस्तुभ साखरे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, सचिव रमा कुलकर्णी आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. संजीवनी सोनार उपस्थित होते. विज्ञान भारतीचे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री श्री प्रसाद आणि संशोधन, इनोव्हेशन आणि इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. प्रशांत दुराफेही उपस्थित होते. डॉ. करमाळकर यांनी सांगितले की, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर संमेलनाचे अध्यक्ष असतील. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे प्रमुख पाहुणे असतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, विज्ञान भारतीचे संस्थापक सदस्य डॉ. क. कृ. क्षीरसागर आणि शिक्षण प्रसारक मंडळींच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि मराठीतून विज्ञानाचा प्रसार करू इच्छिणाऱ्यांनी संमेलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. करमाळकर यांनी केले. सुधीर काळकर म्हणाले की, शिक्षण प्रसारक मंडळीचे संशोधन, इनोव्हेशन व इन्क्युबेशन केंद्र संमेलनाचे संयोजक आहे. शिक्षण, विज्ञान आणि साहित्य या तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवता येतील. येणाऱ्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देणे आणि नवनिर्मितीला चालना देणे हा संमेलनाचा उद्देश आहे. नवोपक्रम, विज्ञान संशोधन आणि स्टार्टअप संस्कृती विकसित होण्यासही यामुळे मदत होईल. कौस्तुभ साखरे यांनी सांगितले की, एकदिवसीय संमेलनात उद्घाटन आणि समारोप सत्रांसह विज्ञानकथा वाचन, विज्ञान साहित्यिक परिसंवाद, शास्त्रज्ञांशी विशेष संवाद आणि पॉडकास्टची सत्रे होतील. मराठीतील विज्ञानविषयक साहित्याचा गौरव करणे आणि नवोदित लेखक व विज्ञान संवादकांना व्यासपीठ देणे हा संमेलनाचा उद्देश आहे. यानिमित्ताने मराठी विज्ञानकथा लेखन आणि अभिवाचन स्पर्धेची घोषणाही केली जाणार आहे.
Source link
पुण्यात गुरुवारी विज्ञान साहित्य संमेलन:शंभराव्या मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजन; डॉ. नितीन करमाळकर यांची माहिती