![]()
मध्य प्रदेशातील उज्जैन येथून फूस लावून शहरात आणलेल्या नऊ वर्षांखालील दोन अल्पवयीन मुलांकडून भीक मागवून घेणे, कचरा गोळा करायला लावणे आणि थेट चोरीचे हायटेक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “मनोमय हार्ट फाउंडेशन’चे डॉ. पंकज येलम (राहाता) यांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही निष्पाप मुलांची नरकातून सुटका करण्यात यश आले. उज्जैन येथील एका अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तस्कराने १५ दिवसांपूर्वी पैशांचे आमिष दाखवून या ९ वर्षांखालील दोन मुलांना शिर्डीत आणले होते. साईबाबा मंदिर परिसर व गर्दीच्या ठिकाणी त्यांना भीक मागायला लावली जात होती. १४ मे रोजी रात्री डॉ. येलम यांना ही मुले एका संशयितासोबत दिसली. चौकशी करताच आरोपी फरार झाला. डॉ. येलम यांनी पाठलाग करून मुलांना ताब्यात घेतले. डॉ. येलम यांनी या मुलांना सुरक्षिततेसाठी एका आश्रमात ठेवले होते. मात्र दुसऱ्या दिवशी ही मुले पुन्हा पळून गेली. त्यानंतर पुन्हा शोधमोहीम राबवून त्यांना शोधले. त्यांच्या झडतीत चाकू आणि वायर सापडली असून, त्यांना चोरीचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे मुलांनी कबूल केले. भरपूर पैसे मिळतील असे म्हणत दिले चोरीचे प्रशिक्षण तस्कराने या लहान मुलांना “तुम्हाला शिर्डीत भरपूर पैसे मिळतील, तुमचे लग्नही लावून देऊ” अशी विचित्र आमिषे दाखवली होती. दिवसभर मुलांनी भीक मागून जमा केलेले सर्व पैसे हा मुख्य संशयित स्वतःच्या नशेसाठी हिसकावून घेत होता, अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे.
Source link
उज्जैनमधील 2 बालकांची तस्करी, शिर्डीत मागायला लावली भीक:राहात्यातील डॉ. येलम यांच्या पुढाकारातून सुटका, पालकांच्या स्वाधीन