![]()
उज्जैनला देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून दागिने चोरणाऱ्या दोघांना कळमना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पाच तासांत आरोपींचा शोध लावल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओम नगरमध्ये सिताराम किराणा दुकानाजवळ निशांत अरुण भाटी (३६) राहतात. ते १३ नोव्हेंबरला कुटुंबासह उज्जैनला देवदर्शनासाठी गेले होते. १७ नोव्हेंबरला घरी परतल्यावर घराच्या कुलूपात बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात पाहणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, दोन चेन, अंगठी, मालमत्तेची कागदपत्रे आणि चारचाकीची चावी असा एकूण ३ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. १५ नोव्हेंबरला पहाटे १ ते १.३० दरम्यान दोन संशयित दिसले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून गौरव सचिन पालिवाल (१९) आणि देवेंद्र ऊर्फ दादू किशोरीलाल शाहू (२१) यांची ओळख पटली. दोघेही ओम नगर परिसरात राहतात. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी वेदप्रकाश ऊर्फ छोटू बलेश्वर दास सारवा (रा. जामनगर, भरतवाडा, कळमना) याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. १८ नोव्हेंबरला पोलिसांनी दोघांकडून ४८.५५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, किंमत २ लाख २५ हजार रुपये, आणि ३.९४० ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, किंमत २५ हजार रुपये, जप्त केले. फिर्यादीने घरातील अस्ताव्यस्त साहित्यामध्ये दोन चेन, अंगठी आणि मालमत्तेची कागदपत्रेही सापडल्याचे पोलिसांना सांगितले. जप्त दागिने आणि सापडलेले साहित्य मिळून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
Source link
उज्जैनला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडणारे दोघे अटकेत:कळमना पोलिसांनी पाच तासांत छडा लावला; 2.50 लाखांचे दागिने जप्त