Headlines

संजय राऊतांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही:नागपूरची ओळख जगभरात 'दीक्षाभूमी' म्हणूनच आहे; इंदू मिलचे स्मारक आम्हीच पूर्ण करणार!– चंद्रशेखर बावनकुळे




दादर स्थानकाच्या नामांतरणाच्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नागपूरचे नामांतर ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. “नागपूरची दीक्षाभूमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून, नागपुरात येणारा प्रत्येक व्यक्ती दीक्षाभूमीला भेट देतो. नागपूर दीक्षाभूमीच्याच नावाने जगभरात ओळखले जाते. त्यामुळे संजय राऊत सांगतील तसे करण्याची गरज नाही, दीक्षाभूमीचे महत्त्व संपूर्ण जगाला माहीत आहे,” असा सणसणीत पलटवार बावनकुळे यांनी केला आहे. शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, भटक्या विमुक्त व फासेपारधी समाजासाठी विशेष मोहीम, सातारा जिल्हा बँक राजकारण आणि राहुल गांधींच्या टीकेवर सविस्तर भाष्य केले. किंमत वाढली तरी निधी देऊ; इंदू मिलचे स्मारक आमचेच सरकार पूर्ण करणार मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही काळ बांधकाम साहित्य उपलब्ध होण्यास अडचणी आल्याने प्रकल्पाची किंमत वाढली आणि कामाला थोडा विलंब झाला. मात्र, प्रकल्पाची किंमत कितीही वाढली तरी राज्य सरकार त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यास 2 वर्षे लागणार नाहीत; साहित्य उपलब्ध होताच अवघ्या 1 वर्षात हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या स्मारकाची सुरुवात आम्ही केली असून, ते पूर्णही आमचेच सरकार करेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. 6, 7 आणि 8 जानेवारीला भटक्या समाजासाठी विशेष शिबिरे राज्यातील वंचित आणि भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली. राज्यातील सर्व महसूली मंडळांमध्ये सेवा हमी कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व सेवा देण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. विशेषतः 6, 7 आणि 8 जानेवारी रोजी भटक्या व विमुक्त जाती-जमातींच्या (व्हीजेएनटी) वाड्या-वस्त्या आणि तांड्यांवर विशेष शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये जन्माचे दाखले, आधार कार्ड आणि घरांच्या मालकी हक्काची (स्वामित्व) कागदपत्रे जागेवरच उपलब्ध करून दिली जातील. यासाठी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली एक विशेष अशासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. फासेपारधी समाजासाठी स्वातंत्र्यानंतरची पहिलीच ऐतिहासिक बैठक अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) येणाऱ्या पारधी आणि फासेपारधी समाजाच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. या समाजाच्या वाड्या-वस्त्यांसाठी स्वतंत्र गावठाण गठित करणे, तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देणे, मुलांच्या शिक्षणाची सोय करणे आणि महिला बचत गटांसाठी रोजगारनिर्मितीची साधने उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. सातारा जिल्हा बँकेचा वाद हा स्थानिक; महायुतीवर परिणाम नाही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना बावनकुळे यांनी हा विषय स्थानिक असल्याचे स्पष्ट केले. “बँकांचे राजकारण हे जिल्हास्तरीय आणि स्थानिक पातळीवरचे असते. एखाद्या जिल्ह्यात एखाद्या विषयावरून मतभेद होऊ शकतात, पण त्याला महायुतीचा वाद म्हणता येणार नाही. याचा राज्यातील महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर यावा, जेणेकरून जनतेतील संभ्रम दूर होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे संबंध कसे होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधींना ‘मोदी ज्वर’ जडलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, “राहुल गांधी यांना सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ‘मोदी ज्वर’ चढलेला असतो. आपण स्वतः पंतप्रधान झालो आहोत अशी स्वप्ने ते पाहत असतात, त्यामुळे ते ‘स्वप्न के सौदागर’ आहेत.” दरम्यान, हापूस आंब्याच्या जीआय टॅगवरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना, गुजरातच्या पट्ट्याला जीआय टॅग देण्याचा निर्णय हा चेन्नई न्यायालयाने दिला असून त्याच्याशी महाराष्ट्र शासनाचा किंवा कोणत्याही सरकारी आदेशाचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नागपूरच्या तिसऱ्या रिंगरोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकली असून, डिफेन्स न्युक्लिअर एरोस्पेस (डीएनए) प्रकल्पासाठी बागायती जमीन न घेण्याबाबत पूर्ण माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करू, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. ———————————————— हेही वाचा… मेरिटवर शिवसेना कालही उद्धवजींचीच होती आणि उद्याही राहील:बारामती विमानतळाचानिधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादांचा अपघात टळला असता –सुप्रिया सुळे सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. “मी कोणतीही भविष्यवाणी करत नाही; मात्र गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर शिवसेना हा पक्ष कालही उद्धव ठाकरे यांचाच होता, आजही आहे आणि उद्याही त्यांचाच राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या विकासासाठी मंजूर झालेला 64 कोटी रुपयांचा निधी, इंदापूरमधील मतदार यादीतून नावे वगळल्याची कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, दुष्काळी परिस्थिती आणि शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *