![]()
अकलूजमध्ये ‘उद्योग महर्षी चषक’ राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा सुरू झाल्या असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले. पहिल्या दिवशी झालेल्या १६ चुरशीच्या सामन्यांनी क्रीडारसिकांना रोमांचक खेळाची मेजवानी दिली. यामध्ये नागपाडा मुंबई, बंगळुरू, नांदेड, पुणे, अमरावती आणि नागपूरच्या संघांनी दमदार कामगिरी केली. उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दि. २ ते ४ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे होत आहेत. उद्घाटनप्रसंगी डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, कीर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, देवन्या मोहिते-पाटील, नगरसेवक क्रांतिसिंह माने-पाटील, नगराध्यक्षा रेशमा अडगळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. नागपाडा मुंबईने एसएनजी नागपूरवर ६४-५४, तर बंगळुरूने बारामतीवर ५९-५३ असा विजय मिळवला. अमरावतीने नागपूर अचीव्हर्सला ५८-५६ आणि जय हिंद कडा, बीडला ६०-५५ असे पराभूत केले. एसकेबीए पुणेने ग्रीन स्टार सोलापूरवर ५६-५५ अशी एका गुणाने मात केली. विजेत्या संघाला ७१ हजार व चषक स्पर्धेतील विजेत्या संघाला ७१ हजार रुपये व चषक, उपविजेत्याला ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी २१ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट खेळाडूला ५ हजार १ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवारी अंतिम स्पर्धा होत असून सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.
Source link
उद्योग महर्षी चषक:नागपूर, मुंबई, बंगळुरू, पुणे, अन् अमरावतीचे संघ विजयी, अकलूजमध्ये राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा