![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांचीच सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळ आणि जादूटोण्याच्या नावाखाली त्रास दिल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे हायप्रोफाइल प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून न्यायालयात धक्कादायक दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विनायक राऊत यांच्या बाजूने एकूण तीन वकिलांनी युक्तिवाद केला. त्यांनी सुनेचे आरोप फेटाळून लावण्यासाठी अनेक पुरावे न्यायालयासमोर ठेवले. विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश आणि सून गिरीजा राऊत यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्सच्या प्रिंटआऊट्स न्यायालयात सादर करण्यात आले. परदेश दौऱ्यांचे पुरावे याशिवाय गिरीजा आणि गीतेश राऊत हे दोघे एकत्र अनेक देशांत फिरायला गेले होते, याचे पुरावे न्यायालयाला दाखवण्यात आले. “जर पती-पत्नीमध्ये वाद होते किंवा गीतेशला सोबत राहायचे नव्हते, तर ते एकत्र परदेशात फिरायला का गेले असते?” असा सवाल वकिलांनी उपस्थित केला. जादूटोण्याचा उल्लेखावर आक्षेप एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार कुठेही जादूटोण्याचा थेट विषय समोर येत नाही, असा दावा राऊत यांच्या वकिलांनी केला. तसेच, बाबाकडे जाताना गिरीजा यांचे वडीलही सोबत असायचे, असेही न्यायालयात सांगण्यात आले. अटक केलेल्या ‘बाबा काझी’चा न्यायालयात वेगळाच दावा गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात नाव आलेला भोंदू बाबा काझी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या वकिलांनीही न्यायालयात बाजू मांडताना राऊत कुटुंबीयांचे दावे आणि आरोप यावर भाष्य केले. “मी एक मौलवी असून लोकांच्या भल्यासाठी दुवा मागत असतो. मी गिरीजा यांच्यासाठीदेखील दुवा मागितली होती, परंतु हे कृत्य मी स्वतःहून केले नसून गिरीजा राऊत यांच्या आई-वडिलांच्या विनंतीवरून आणि सांगण्यावरूनच मी दुवा मागितली होती,” असा दावा या भोंदू काझीने त्याच्या वकिलांमार्फत कोर्टात केला. नेमके प्रकरण काय? विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी आपल्या पतीसह सासरच्या मंडळींकडून अनेक वर्षे मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी जादूटोण्याच्या नावाखाली त्रास दिला गेला, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडले तसेच एका कथित भोंदू बाबामार्फत विविध विधी करण्यात आले, असे गंभीर आरोप केले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान कथित भोंदू बाबा काझी यालाही अटक करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेऊन विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. याच अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने व्हॉट्सॲप चॅट, परदेश दौऱ्यांची कागदपत्रे आणि इतर पुरावे सादर करत तक्रारीतील आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी गिरीजा राऊत यांच्या बाजूने तक्रारीतील आरोप कायम ठेवण्यात आले आहेत. हे ही वाचा… नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा… सरकारची दोन लाखांची कर्जमाफी कागदावरच?:1.54 लाखांच्या कर्जावर अवघी 94 हजारांची माफी, धाराशिवमध्ये शेतकरी संतप्त राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ सुरू असल्याचा दावा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात कर्जमाफीच्या यादीतील तफावतीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 1.54 लाखांच्या कर्जावर अवघी 94 हजारांची माफी देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन लाखांपर्यंतच्या कर्जाची थकबाकी असतानाही प्रत्यक्ष यादीत अत्यंत कमी रक्कम माफ झाल्याचे दिसून येत असल्याने, “ही कर्जमाफी म्हणजे निव्वळ जुमला आहे,” असा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सविस्तर वाचा…
Source link
उबाठा नेत्याच्या सुनेचे कौटुंबिक छळाचे आरोप:विनायक राऊतांनी कोर्टात व्हॉट्सॲप चॅट्स अन् परदेश दौऱ्यांचे पुरावे केले सादर, कोर्टात काय घडले?