![]()
उसाला प्रतिटन चार हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी करत आज राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर मनमाड रस्त्यावर शेतकरी संघटनेने चक्का जाम केल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. वाहनांच्या मोठ्या रांगा महामार्गावर लागल्या आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच होते. या आंदोलनात विविध गटांचे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. अद्याप प्रशासनाकडून कुठलीही भूमिका स्पष्ट न झाल्याने हा चक्का जाम सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते ॲड. अजित काळे यांनी सांगितले. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनी भाव जाहीर केला आहे. मात्र नगरचे कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस तोडून गळीत केले मात्र अद्याप भावाबाबत मौन साधत शेतकऱ्यांना एकही रुपया दिवाळीत दिला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्याचे पाप कारखानदारांनी केल्याचे शिंदे गटाचे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले. मागणी करूनही अद्याप भाव जाहीर केला नसल्याने या साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे प्रकाश देठे यांनी सांगितले. विशेष म्हणजे रस्त्यावर मंडप टाकून शेतकरी आंदोलकांनी दुपारचे जेवण रस्त्यावरच केले व आंदोलन सुरू ठेवले. पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र तरीही त्यांना पर्यायी मार्ग काढून वाहतूक वळविण्यात आल्याचे दिसून आले. या आंदोलनात शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटना शरद जोशी विचार मंच, रयत क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती संघटनेसह वंचित बहुजन आघाडी, मराठा एकीकरण समिती आदी सहभागी झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाची धार वाढली असून यामधून शासनाला तत्काळ भाव जाहीर करून नरमाईची भूमिका घ्यावी लागेल अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
Source link
ऊस दरासाठी राहुरीत महामार्गावर शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन:आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच केले दुपारचे जेवण; जोरदार घोषणाबाजी