Headlines

शहर, उपनगरात एकाच दिवसात फटाक्यांमुळे आगीच्या 20 घटना:मोकळ्या जागांवरील झुडपांसह काही दुकाने, गोडाऊन खाक




शहरात आणि उपनगरांमध्ये रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या २० घटनांची नोंद झाली आहे. फटाक्यांमुळे आग लागून या घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यात मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला लागलेली आग सर्वात भीषण होती. यासह शहर व उपनगरात झाडेझुडपे, दुकाने, पान टपऱ्या, छोटे शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ५० कर्मचाऱ्यांची पहाटे तीन वाजेपर्यंत धावपळ सुरू होती. व्हीआरडीई, एमआयडीसीसह इतर यंत्रणांचीही मदत घेण्यात आली. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोडाऊनला आग लागल्यानंतर सायंकाळी साडेसात ते पहाटे तीन वाजेपर्यंतच्या काळात शहरात १९ ठिकाणी आगी लागल्या. यामध्ये सिद्धार्थनगर, जुने सिव्हिल हॉस्पिटलसमोरील दुकान, लालटाकीतील पेट्रोल पंपाजवळील भंगार दुकान, डी-मार्ट समोरील पान टपरी, भिंगार, टीव्ही सेंटर रोड, बालिकाश्रम, माळीवाडा, तारकपूर, डी मार्टसमोर, जिल्हा रुग्णालयासमोर, तपोवन रोड, गुलमोहर रोड, माणिकनगर, नेप्ती नाका परिसर, बागडपट्टी अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. अग्निशमन दलाने रात्रभर धावपळ करत या सर्व आगींवर नियंत्रण मिळवून जीवितहानी टाळली. रविवारी दिवसभरात व मध्यरात्री घडलेल्या घटना या फटाक्यांमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. “अग्निशमन’ची एनओसी फक्त कागदावरच शहरात घडलेल्या या आगीच्या मालिकांवरून विशेषतः मंडप आणि डेकोरेशनच्या गोडाऊनला लागलेल्या आगीवरून आग प्रतिबंधक उपाययोजनांचे गांभीर्य समोर येते. इमारतीच्या बांधकामांच्या वेळी अग्निशमन विभागाकडून ना हरकत घेतली जाते. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक उपाययोजना होत नसल्याचे या घटनांमधून समोर आले आहे. मंडप आणि डेकोरेशनच्या गोडाऊनमध्ये कापड, बांबू, फायबर आणि सिंथेटिक कार्पेट्स यांसारख्या अत्यंत ज्वलनशील वस्तूंचा साठा असतो. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. इतर ठिकाणी दुकानांमध्येही तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर आले. त्यामुळे आस्थापनांकडून आग प्रतिबंधक उपाययोजना गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे समोर येत आहे. टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची गस्त हवी शहर व उपनगर भागात अनेक ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये तेथील रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील युवक एकत्र येऊन फटाके फोडतात. अनेक ठिकाणी रस्त्यावर आडवे रॉकेट्स सोडणे, पेट्रोल टाकून एकाचवेळी अनेक फटाके फोडणे, लड पेटवून ती इतरत्र फेकणे, साचलेला कचरा पेटवून त्यात फटाके फेकणे असे गैर प्रकार टवाळखोर युवकांकडून घडत आहेत. यातूनच आगीच्या घटना घडण्याची शक्यता असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *