Headlines

एनसीसी कॅम्पमध्ये ‘फायर सेफ्टी’ प्रात्यक्षिक:400 विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाचे मार्गदर्शन : गॅस गळतीपासून आग आटोक्यात आणण्यापर्यंत प्रशिक्षण




आग लागल्यास घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे आणि योग्य वेळी योग्य उपाय करणे महत्त्वाचे असते. मात्र, आगीच्या घटनांमध्ये अनेकदा घाबरल्यामुळे चुकीच्या पद्धतीने उपाय केले जातात. त्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी आग आटोक्यात आणण्याच्या पद्धती, गॅस सिलिंडरला आग लागल्यास घ्यावयाची काळजी आणि आगीत अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याची माहिती असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने व्हीएमव्ही रोडवरील एनसीसी कॅम्पमध्ये फायर डेमो आयोजित करण्यात आला. या प्रात्यक्षिकात सुमारे ४०० एनसीसीच्या विद्यार्थी-विद्यार्थ िनींसह कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपाय आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ६२ महाराष्ट्र एनबी कंपनीचे कमांडर आशिष चंद्रा यांच्या विनंतीवरून हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे आणि अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या आदेशानुसार केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबळे आणि पाळीप्रमुख किशोर शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या पथकाने प्रात्यक्षिके सादर केली. फायर लॉरी क्रमांक एमएच २७ बीएक्स ७२०२ च्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली. यावेळी फायरमन अमोल साळुंके आणि वाहनचालक सागर टपके उपस्थित होते. प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांना आग म्हणजे काय, आगीचे विविध प्रकार आणि आग बुजवण्याच्या पद्धती समजावून सांगण्यात आल्या. आग लागल्यानंतर कोणत्या प्रकारची आग आहे, हे ओळखून त्यानुसार योग्य अग्निशमन साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्राचा वापर करून प्राथमिक स्वरूपातील आग कशी आटोक्यात आणायची याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. घरगुती वापरातील एलपीजी गॅसची गळती झाल्यास काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याचीही माहिती देण्यात आली. गॅस सिलिंडरला आग लागल्यास घाबरून न जाता सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगीच्या किंवा धुराच्या ठिकाणी नागरिक अडकल्यास त्यांची सुरक्षित सुटका कशी करावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाशी संपर्क कसा साधावा, हेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना आगीच्या घटनांमध्ये स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता कशी राखावी, याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. केवळ माहिती न घेता प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिल्याने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांची समज विद्यार्थ्यांना मिळाली. आग लागल्यास काय काळजी घ्यावी? घरात एलपीजी गॅसचा वास आल्यास कोणतेही विद्युत स्विच सुरू किंवा बंद करू नयेत. माचीस, लायटर किंवा इतर ज्वलनशील वस्तूंचा वापर टाळावा. सुरक्षित असल्यास गॅसचा रेग्युलेटर बंद करून दरवाजे-खिडक्या उघडाव्यात आणि परिसर रिकामा करावा. विद्युत उपकरणांना आग लागल्यास पाण्याचा वापर करू नये. अशा वेळी योग्य अग्निशमन यंत्र वापरणे आवश्यक आहे. आगीच्या ठिकाणी धूर पसरल्यास खाली वाकून किंवा रांगत सुरक्षित बाहेर पडावे. लिफ्टचा वापर टाळून जिन्याने बाहेर पडावे. आग नियंत्रणाबाहेर गेल्यास त्वरित १०१ किंवा ११२ या क्रमांकावर मदत मागावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *