![]()
देशभरात सातत्याने वाढणाऱ्या डिझेलच्या दरांचा मोठा फटका आता राज्य परिवहन महामंडळाला बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत डिझेलच्या किमतीत 4 वेळा वाढ झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या खर्चात 310 कोटी रुपयांची भर पडली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महामंडळासमोर आता आणखी मोठं संकट उभं राहिलं असून भविष्यात एसटी प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत या वाढत्या आर्थिक तणावाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारकडून मदत मिळाली नाही तर भविष्यात काही प्रमाणात भाडेवाढ करावी लागू शकते. एसटी महामंडळाचा याआधी डिझेलवरील वार्षिक खर्च सुमारे 3300 कोटी रुपये होता. मात्र, डिझेल दरवाढीनंतर हा खर्च वाढून जवळपास 3610 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 15 मे रोजी डिझेलच्या दरात पहिली वाढ 3.10 रुपयांनी झाली आणि त्यामुळे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला. त्यानंतर 93 पैशांच्या वाढीमुळे 37.20 कोटी, 91 पैशांच्या वाढीमुळे 36.40 कोटी, तर चौथ्या टप्प्यात 2.81 रुपयांच्या वाढीमुळे आणखी 112.40 कोटी रुपयांचा फटका बसला. या सर्व वाढींमुळे महामंडळाचा आर्थिक ताळमेळ बिघडू लागल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. एप्रिल 2026 या एका महिन्यातच महामंडळाला जवळपास 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचंही त्यांनी सांगितलं. डिझेल बचतीसाठी आता परिवहन विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्यातील प्रत्येक आगाराला दररोज किमान 5 लिटर डिझेल बचतीचे लक्ष्य देण्यात आले आहे. ज्या आगाराकडून जास्त बचत होईल, त्यांना विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली. चालकांचे समुपदेशन, वाहनांची नियमित देखभाल आणि इंधन बचतीच्या पद्धतींचा वापर करण्याच्या सूचना आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. एका दिवसात 1000 लिटर डिझेल वाचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून बचत करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन भत्ताही दिला जाणार आहे. तसेच एसटी महामंडळाला रोज सुमारे 10 लाख 87 हजार लिटर डिझेल लागते आणि चार वेगवेगळ्या कंपन्यांकडून त्याचा पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संभाव्य भाडेवाढीच्या चर्चेमुळे प्रवाशांमध्ये चिंता वाढली असताना प्रताप सरनाईक यांनी सध्या तरी तातडीने भाडेवाढ होणार नसल्याचं स्पष्ट केलं. महिलांना दिलेली 50 टक्के सवलत, दिव्यांगांसाठीची मोफत सेवा आणि इतर योजनांचे पैसे शासनाकडून वेळेवर मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, डिझेलचे दर अशाच पद्धतीने वाढत राहिले तर भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात, असे संकेत त्यांनी दिले. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वाची बैठकही पार पडली. डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. नवीन ईव्ही घेऊन सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी याचवेळी प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या कृतीतून इंधन बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी स्वतःची जुनी पेट्रोल कार विकून नवी इलेक्ट्रिक कार खरेदी केली. नवीन ईव्ही वाहन घेऊन ते थेट सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. पेट्रोल आणि डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. राज्यात पुढील काळात इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर भर दिला जाणार असून प्रमुख 200 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
Source link
एसटीचं चाक डिझेल दरवाढीत अडकलं, 310 कोटींचा फटका:सरनाईकांचे मोठे संकेत; मोदींच्या आवाहनानंतर ईव्हीही घेतली