![]()
प्रवाशांकडून अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीबाबत तक्रारी होत असताना, अंजनगाव सुर्जी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. परतवाडा आगाराच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत व रोख रक्कम हरवली होती. मात्र, वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे हा मौल्यवान ऐवज महिलेला सुखरूप परत मिळाला. १० मे रोजी ड्युटी क्रमांक ११ ची अकोला-परतवाडा (बस क्र. एमएच ४०-८८२८) ही बस अकोट ते अंजनगाव मार्गावर धावत होती. दहीगाव रेचा येथील एक महिला प्रवासी सोन्याची पोत आणि रोख रक्कम असलेली पिशवी बसमध्येच विसरून जुन्या बसस्थानकावर उतरली. काही वेळानंतर ही बाब लक्षात येताच महिलेची घाबरगुंडी उडाली. तोपर्यंत बस परतवाड्याजवळ पोहोचली होती. महिलेने तत्काळ अंजनगाव आगाराचे कंट्रोलर सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने बसचे वाहक संदीप झाडे आणि चालक गोपाल देशमुख यांना माहिती दिली. बसमध्ये शोध घेतल्यानंतर संबंधित पिशवी सुरक्षित स्थितीत सापडली. कोणताही मोह न बाळगता दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्वरित कंट्रोलर सय्यद यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण तपासणीअंती सोन्याची पोत व रोख रक्कम महिलेला सुपूर्त केली. महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अंदाजे दोन लाख रुपयांचा ऐवज परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. प्रवाशांच्या सेवेसोबतच त्यांच्या वस्तूंची जबाबदारी जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले आहे. अंजनगाव आगाराचे कंट्रोलर सय्यद यांनीही संदीप झाडे व गोपाल देशमुख यांच्याकर्तव्यदक्षतेचे विशेष कौतुक केले. या घटनेमुळे एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला.
Source link
एसटी कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा:महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिणे, रोख रक्कम सुखरूप परत