Headlines

कँडल मार्च:जपतलाईत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुकल्यांना हरसूलमध्ये श्रद्धांजली




गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. या हृदयद्रावक घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी हरसूलमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांनी कँडल मार्च काढत मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून कँडल मार्चला सुरुवात झाली. मज्जित चौक मार्गे मार्च संताजी महाराज चौक, मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत बिरसा मुंडा चौकात पोहोचला. याठिकाणी उपस्थितांनी मृत तीन चिमुकल्या विद्यार्थिनींना श्रद्धांजली अर्पण केली. मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात श्रद्धांजली देताना अनेकांचे डोळे पाणावले. उपचार घेत असलेल्या तीन विद्यार्थिनी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठीही नागरिकांनी प्रार्थना केली. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. डॉ. रघुनाथ भोये व जीवन भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गावित, प्रल्हाद पवार, हर्षद पवार आदींनी कँडल मार्चसाठी परिश्रम घेतले. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाच्या किंवा संघटनेच्या झेंड्याशिवाय काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये हरसूल व परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तीन चिमुकल्यांच्या मृत्यूचे दुःख हे कोणत्याही पक्षाच्या पलीकडचे असल्याचे या आंदोलनातून दिसून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *