Headlines

करमाळ्यात एकल महिलांचा गौरव‎:अर्जुननगर ग्रामपंचायतीत एकल महिला दिन उत्साहात साजरा




करमाळा अर्जुननगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक एकल महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात कोणत्याही आधाराशिवाय स्वाभिमानाने जगणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढणाऱ्या एकल महिलांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी हा सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच अश्विनी थोरात व चंद्रकला भोगे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या सोहळ्यात प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आपल्या मुलांना उच्चशिक्षित व यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टाबद्दल चंद्रकला भोगे, लता भोगे, गुलचाबाई आडसुळ, सिंधुबाई सोनवणे, जयश्री ननवरे आणि मनिषा शिरवाळे या एकल महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या या प्रेरणादायी संघर्षाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी मनोज लटके यांनी उपस्थित एकल महिलांना शासकीय योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर आर्थिक लाभांची सविस्तर तांत्रिक माहिती दिली. अंगणवाडी सेविका सोनाली ढवळे, लंका भोसले, प्रेमा भोगे आणि बचत गट प्रवर्तक सुरेखा घाडगे यांच्या पुढाकाराने गावातील सर्व एकल महिलांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सुरेखा घाडगे यांनी एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष बचत गट स्थापन करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी मनोज लटके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बापुराव ढवळे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील सर्व अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, बचत गटाच्या महिला, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सन्मानित महिलांच्या पाल्यांचे नेत्रदीपक कार्य . चंद्रकला भोगे यांच्या मुलाने करमाळा येथे ‘गुरुकुल पब्लिक स्कूल’ या शैक्षणिक संस्थेची उभारणी केली आहे. . लता भोगे यांचा मुलगा अजय भोगे हा स्टेट बँकेत नोकरीस असून, मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे आरोग्य विभागात नोकरी करत आहे. . गुलचाबाई आडसुळ यांची तीन मुले गावातच शेती, किराणा दुकान, दूध संस्था आणि हॉटेल व्यवसायात कार्यरत असून एकत्र कुटुंबात राहतात. . मनिषा शिरवाळे यांचा एक मुलगा व एक मुलगी सध्या उच्च शिक्षण घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *