![]()
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबन गीतानंतर सुरू असलेल्या हक्कभंग प्रकरणावरून राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामराला इशारा दिला होता. या इशाऱ्याला कामराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्मिक उत्तर दिले असून, थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा दाखला दिला आहे. कुणाल कामराच्या विरोधात विधानसभेत दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावाबाबत बोलताना प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ते म्हणाले, “कुणाल कामरा समितीसमोर आपली बाजू मांडत आहे, ते ठीक आहे. पण जर एकनाथ शिंदेंबद्दल वेगळ्या पद्धतीने गाणी गाणे हाच त्याचा धंदा असेल, तर त्याने शिवसैनिकांचा आक्रमक पवित्राही समजून घ्यावा. जुन्या काळात शिवसैनिक कसे काम करायचे, हे त्यांनी जाणून घ्यावे.” सरनाईक यांच्या या विधानाचा रोख थेट कामराला धमकावण्याकडे असल्याचे मानले जात होते. बाळासाहेबांच्या ‘व्यंगचित्रां’चा दिला दाखला सरनाईक यांच्या या ‘इशाऱ्या’वर कुणाल कामराने अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला. “कलाकारांना धमकावण्यातून जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा थोडा वेळ काढून हे नक्की वाचा,” अशा कॅप्शनसह कामराने एक लांबलचक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये कामराने म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः अनेक दशके व्यंगचित्रकार म्हणून काम केले. त्यांनी अनेक सत्ताधाऱ्यांची, अगदी तत्कालीन पंतप्रधानांचीही आपल्या कुंचल्यातून मस्करी केली आणि त्यांच्यावर टीका केली. ज्या राजकीय विचारधारेचे वारसदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे करत आहेत, त्या विचारधारेचा पायाच मुळी ‘राजकीय उपरोध’ (Political Satire) हा आहे.” लोकशाहीत कलेचा आणि उपरोधाचा वापर करणाऱ्या कलाकारांविरुद्ध विधिमंडळाच्या विशेषाधिकारांचा वापर करणे चिंताजनक असल्याचेही त्याने नमूद केले. वादाची पार्श्वभूमी काय? हा संपूर्ण वाद गेल्या वर्षी ‘हॅबिटॅट कॉमेडी क्लब’मध्ये झालेल्या एका कार्यक्रमातून सुरू झाला. या कार्यक्रमात कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबन गीत गायले होते. या गाण्यात त्याने शिंदेंचा उल्लेख उपरोधिकपणे ‘गद्दार’ असा केला होता. या विधानानंतर संतप्त शिवसैनिकांनी संबंधित क्लबची तोडफोड केली होती. त्यानंतर कामराच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. सध्या एक विशेष समिती या प्रकरणाची चौकशी करत असून कामराची बाजू ऐकून घेतली जात आहे.
Source link
कलाकारांना धमकावण्यापेक्षा बाळासाहेबांचा इतिहास वाचा:कुणाल कामराचे मंत्री प्रताप सरनाईकांना मार्मिक प्रत्युत्तर