आगामी 30 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 33 टक्के महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक येण्याच्या शक्यतेवरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी
.
“या विधेयकांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक खासदाराला 150 कोटी रुपये दिले जात असल्याचा बिनबुडाचा आरोप संजय राऊत रोज करत आहेत. आता या विधेयकाला खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे; मग सुप्रिया सुळेंनी 150 कोटी रुपये घेतले का, याचे उत्तर संजय राऊतांनी द्यावे,” असा थेट सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. तसेच, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या अत्यंत सक्षमपणे काम करत असून, त्यांना बदलण्याचा कोणताही तातडीचा निर्णय सरकार घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊतांचे भाकीत आजवर कधीच खरे ठरले नाही
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला. घटनेनुसार विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून 33 टक्के महिला आरक्षणामुळे महिलांना खरा सन्मान मिळणार आहे. डिलिमिटेशन विधेयक मांडताना कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. संजय राऊत यांना या बिलाला विरोध करायचा असेल तर त्यांनी लोकसभेत विरोधात मतदान करावे; मात्र स्वतःच्या सहकाऱ्यांवर आणि विरोधकांवर 150 कोटींच्या भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करणे योग्य नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सुटल्याने राऊतांची अस्वस्थता
संजय राऊत हे राजकारणात नकारात्मक बोलणारे एकमेव नेते आहेत. 2019 पासून त्यांनी केलेले एकही भाकीत आजवर सत्यात उतरलेले नाही; त्यामुळे ते जे बोलतात त्याचा नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो. आज ना काँग्रेस त्यांच्यासोबत राहिली आहे, ना राष्ट्रवादी काँग्रेस; त्यामुळे एकटे पडल्याच्या नैराश्यातून ते अशी विधाने करत आहेत. तसेच, शरद पवार गटाने अधिवेशनापूर्वी काढलेला ‘व्हीप’ ही सर्वच पक्षांची नेहमीची संसदीय परंपरा आहे, त्यात काहीही नवीन नाही. राहुल गांधींनीही आपले खासदार सांभाळून ठेवावेत, कदाचित त्यांचेही खासदार या विधेयकाला उघड पाठिंबा देतील, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

पुण्यातील गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष, पण पालकमंत्री बदलणार नाही
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावर आणि पालकमंत्री बदलाच्या मागणीवर शिरसाट यांनी सरकारची भूमिका मांडली. पुणे हे सुसंस्कृत शहर असून तिथे रस्त्यावर होणारे खून वेदनादायी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जनतेचा असंतोष लक्षात घेता सरकार यावर नक्कीच ठोस पावले उचलेल.
सुनेत्रा पवार कर्तबगार नेत्या
सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली असली आणि त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी गटांत आंदोलने सुरू असली तरी तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. सुनेत्रा पवार या एक कर्तबगार महिला नेत्या असून त्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याबाबत सरकार कोणताही तातडीचा निर्णय घेणार नाही; मुख्यमंत्री यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.
अभिजित दिपके व सहकाऱ्यांवरील ‘लूकआऊट नोटीस’ हा केवळ खबरदारीचा भाग
अभिजित दिपके, सौरभ दास आणि इतरांविरोधात जारी करण्यात आलेल्या लूकआऊट नोटीसबाबत बोलताना शिरसाट यांनी तांत्रिक बाजू स्पष्ट केली. लूकआऊट नोटीस जारी केली म्हणजे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असा अर्थ होत नाही. पोलिसांकडे असलेल्या माहितीच्या आधारे चौकशीची आवश्यकता भासल्यास संबंधित व्यक्तींनी परदेशात जाऊ नये आणि चौकशीसाठी उपलब्ध राहावे, याकरिता सरकारने खबरदारीचा उपाय (प्रिकॉशन) म्हणून ही नोटीस बजावली आहे.
जरांगे पाटलांच्या पेनड्राईव्हची पोलीस चौकशी करतील
मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे पेनड्राईव्ह सोपवला असून ही सर्व कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. आमच्या नेत्यांचीही चौकशी करण्याची मागणी होत असली, तरी पोलीस निःपक्षपातीपणे तपास करतील आणि दोषी आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही.
जालन्यातील नाराजी, 50000 वृक्षतोड
या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी पक्षांतर्गत आणि पर्यावरणीय मुद्द्यांवरही स्पष्टीकरण दिले. जालना जिल्ह्यात शिवसेनेचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याची चर्चा असली तरी संपूर्ण तालुका गेलेला नाही. ही नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नसून स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबत आहे. एकनाथ शिंदे स्वतः आज दौऱ्यावर असून ते यावर योग्य निर्णय घेतील.
रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी सुमारे 50000 झाडे तोडली जाणार असल्याबाबत सध्या आपल्याकडे अधिकृत माहिती नाही; मात्र विकासासोबतच जंगल वाचले पाहिजे आणि वृक्षतोड कमीत कमी व्हावी, हीच सरकारची भूमिका आहे.
एकनाथ शिंदेंचा सल्ला सर्वांसाठीच
‘तुम्ही टीका करा, मी काम करेन’ ही एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आहे. मंत्र्यांनी व नेत्यांनी कमी बोलून कामावर लक्ष केंद्रित करावे, हा त्यांचा सल्ला कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून सर्वांसाठीच समान आहे आणि त्याचे पालन केले जाईल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
———————————————————————————-
हेही वाचा…
पालकत्व आणि पालकमंत्री यातील फरक समजून घ्या: सुनेत्रा वहिनी मोठ्या भावाच्या पत्नी; भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला आघाडीने पुणे व मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत अत्यंत समंजस भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी