Headlines

काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी असे दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपने यापैकी आपल्या वाट्याला येणाऱ्या 6 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली. सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आपले पत्ते अजून उघड केले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कुणाला उमेदवारी देणार? याविषयी उत्सुकता लागली आहे. पण विरोधी बाकावरील ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रंगणांगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पण आता काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे. काय म्हणाले भाई जगताप? काँग्रेस नेते भाई जगताप या प्रकरणी बोलताना म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या दिल्लीत आहेत. ते आमच्या नेत्यांशी चर्चा करून विधान परिषदेच्या निवडणुकीसंबंधी योग्य तो निर्णय घेतील. उद्या अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणी जे काही आहे तोपर्यंत स्पष्ट होईल. या प्रकरणी एवढे अस्वस्थ होण्याची काहीच गरज नाही. आम्ही अस्वस्थ नाही. आम्ही स्वस्थ आहोत. काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी हा विषय खूप मोठा आहे. हा विषय एवढा तकलादू नाही. आमचे प्रांताध्यक्ष दिल्लीतच आहेत. या सगळ्या घडामोडी होत असताना आम्ही सर्व जबाबदार आहोत. या जबाबदारीनेच सगळ्या गोष्टी होतील. आतापर्यंत याबाबतीतची अधिकृत माहिती किंवा घोषणा हे प्रांताध्यक्षच करू शकतील. मी किंवा इतर कुणीही करू शकणार नाही. पण माझ्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष कदाचित या निवडणुकीत आपला उमेदवार देईल. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले होते उमेदवार देण्याचे संकेत उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार नसतील तर काँग्रेस आपला उमेदवार देईल अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते तिथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात ते या मुद्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पक्षाचा निर्णय जाहीर करतील असा अंदाज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *