Headlines

कायदा-सुव्यवस्था शहांच्या हातात 100% सुरक्षित:तुषार कपूर धमकी प्रकरणावर शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले- परदेशातून बसून पोकळ धमक्या देणाऱ्यांची गय नाही!




बॉलिवूड अभिनेते तुषार कपूर यांना मिळालेली खंडणीची धमकी आणि सदीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर वाढवण्यात आलेली बुलेटप्रूफ काचेची सुरक्षा यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकीय टीकेला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आनंद दुबे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “देशाची कायदा व सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भक्कम हातांमध्ये आहे. त्यांना उगीच चाणक्य म्हटले जात नाही. कितीही बिकट परिस्थिती असली तरी समाजकंटकांना शोधून गजाआड करण्यात त्यांची हातोटी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कायदा-सुव्यवस्था अत्यंत चोख असून जनतेने अथवा कोणीही घाबरून जाण्याचे काडीचेही कारण नाही,” असा ठाम विश्वास आनंद दुबे यांनी व्यक्त केला. वृत्तसंस्था पीटीआयशी (PTI) बोलताना शिवसेना नेते आनंद दुबे यांनी बॉलीवूड कलाकारांच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांच्या तपासाची माहिती दिली आणि या संवेदनशील विषयावर विरोधक घाणेरडे राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप केला. तुषार कपूर धमकी प्रकरण अभिनेते तुषार कपूर यांना परदेशातून आलेल्या कथित धमकीच्या फोनबाबत बोलताना आनंद दुबे म्हणाले, गुन्ह्याची नोंद आणि तत्पर तपास: “तुषार कपूर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास त्वरित मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे (AI) युग आहे. त्यामुळे परदेशातून आलेला हा फोन कॉल खरा आहे, बनावट आहे की कोणी मुद्दाम डमी कॉल केला आहे, याचा तपास क्राईम ब्रँच आणि खंडणीविरोधी पथक संयुक्तपणे करत आहे. तुषार कपूर यांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर ठेवली जाणार नसून, त्यांना पूर्ण पोलीस संरक्षण दिले जाईल. परदेशात बसून अशा पोकळ धमक्या देणाऱ्यांना शासन कधीही खपवून घेणार नाही.” महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत मोठी वाढ अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर चाहत्यांना भेटण्यासाठी उभारण्यात आलेल्या संरक्षणात्मक काचेच्या स्क्रीनबाबत स्पष्टीकरण देताना दुबे यांनी सांगितले. “अमिताभ बच्चन हे देशाचे लाडके आणि शतकाचे महानायक आहेत. संपूर्ण देशातील पिढ्यान्‌पिढ्या त्यांना बघत मोठ्या झाल्या आहेत. त्यांना आधीपासूनच पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे.” निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त “अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानासह, कार्यालय आणि इतर हालचालींच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” महाराष्ट्रात महायुतीचे मजबूत नेतृत्व; विरोधक संकटात संधी शोधतात! राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना आनंद दुबे यांनी विरोधकांच्या हेतूवर थेट निशाणा साधला. “केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.” कसाई के मनाने से गाय माता नहीं मरा करती “विरोधकांचे काम केवळ प्रत्येक घटनेत राजकारण शोधणे आणि संकटाचे रूपांतर राजकीय संधीत करणे हेच राहिले आहे. महाराष्ट्रात अराजकता पसरावी यासाठी विरोधक कितीही प्रयत्न करत असले, तरी एक म्हण आहे—’कसाई के मनाने से गाय माता नहीं मरा करती’. ईश्वर आणि राज्यातील जनता महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.” मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणा 24 तास सतर्क असून, कलाकारांना किंवा नागरिकांना धमकावणाऱ्या कोणत्याही टोळीचा अथवा समाजकंटकांचा बंदोबस्त केला जाईल, असे शेवटी नेते आनंद दुबे यांनी ठामपणे नमूद केले. ————————————————————– हेही वाचा… माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स: वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *