Headlines

काळरात्र:नदीचे रौद्र रूप, तरी बचाव पथकाने 16 जणांना वाचवले




काळरात्र, नदीचे रौद्र रूप, पूरस्थिती अशात धावून आलेल्या जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना वाचवण्यात यश मिळवले. पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांचा यशस्वी सामना केला. ३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि रेस्क्यू टीमच्या शौर्यामुळे १६ जणांना मृत्यूच्या दाढेतून ओढून नवीन आयुष्य मिळवून देण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे छतावर ताटकळलेल्या ९ जिवांना पुराचा वेढा घातला होता. गावालगत वाहणाऱ्या बेंबळा नदीने ३० जुलै रोजी रात्री भयानक रूप धारण केले. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी काही क्षणातच गावात घुसले. नागरिक घरात अडकले आणि प्राण वाचवण्यासाठी त्यांनी छताचा आसरा घेतला. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात चक्रे वेगाने फिरली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या तत्काळ आदेशाने, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम रात्री १२.१० वाजता सर्व साहित्यानिशी घटनास्थळी पोहोचली. छतावर अडकलेली माणसे खाली अथांग पसरलेला पुराच्या पाण्याचा अक्राळविक्राळ पसारा पाहून अक्षरशः थरथर कापत होती. पण, जेव्हा अंधारात रेस्क्यू टीमच्या टॉर्चचा प्रकाश आणि बोटीचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा आपण वाचलो या भावनेने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. रात्रीची वेळ, अंधार आणि पाण्याचा तुफान वेग यामुळे बोट चालवण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना प्रथम प्राधान्य देत, एकापाठोपाठ ९ जणांना सुरक्षित बोटीत बसवून पाण्याच्या तावडीतून बाहेर काढले व प्रशासनाच्या स्वाधीन केले. हनुमंत उके (वय ३४), रवी मेश्राम (वय ३८), सुभाष भोईर (वय ४०), सतीश मारभते (वय २८), आशिष उके (वय १८), गौरव मारबले (वय २२), ओम गिरी (वय १८), अमोल भोयर (वय २९), अनिकेत केवट (वय २५) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या मोहिमेत विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे, गोकुळ मुंडे यांचा समावेश होता. राजुरा येथील मोखड नदीमध्ये बचाव पथकाने सापांचा सामना करून २ वर्षांच्या चिमुकल्याला सुखरूप वाचवले. रात्री ८.३५ वाजताच्या सुमारास राजुरा येथील मोखड नदीच्या पुरामध्ये ७ जण अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुसरे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्री ९.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले. काळोख्या अंधारात नदीच्या तुफान प्रवाहात लाकडाचे मोठे दांडके, पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले विषारी साप फिरत होते.मृत्यूच्या छायेत पथकातील गोताखोरांनी जराही विलंब न करता रबर बोट पाण्यात उतरवली. पाण्याच्या तावडीत अडकलेल्या या ७ जणांमध्ये ४ महिला, २ पुरुष आणि अवघ्या २ वर्षांचे बाळ होते. अडथळ्याना भेदत पथकाने अवघ्या ३० मिनिटांत मोखड नदीच्या पात्रातून ७ जणाना सुखरूप बाहेर काढले. जेव्हा २ वर्षांच्या चिमुकल्या अनन्याला रेस्क्यू टीमने बोटीतून सुरक्षित जमिनीवर आणले, तेव्हा उपस्थिताच्या छातीतील ठोका चुकवणारा काळजीचा क्षण संपून सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव तरळले.साहेबराव जाधव, सावित्री जाधव, पूनम जाधव, जेतालाल जाधव, अनन्या जाधव (वय २ वर्षे), सोनम जाधव, रिना जाधव यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. राजुरा मोहिमेतील सचिन धरमकर, आकाश निमकर, मुकेश सदाशिव, सचिन पवार, चैतन्य पोहाणे, प्रफुल भुसारी, अजय आसोले, आपदा मित्र तुळशीराम गोडाणे, भूषण काळे यांचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *