Headlines

गुन्हे शाखेची कारवाई:रेशनचा 450 क्विंटल तांदूळ जप्त; सरकारी तांदळाचा साठा केला उघड




सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या लाभार्थ्यांसाठी वितरित केला जाणारा सरकारी फोर्टिफाईड तांदूळ बेकायदेशीरपणे साठवून त्याची अवैध विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शहरातील गोपालनगर येथील बंद पडलेल्या सूतगिरणीजवळील एका गोदामावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल ४५० क्विंटल तांदूळ आणि दोन ट्रक असा एकूण ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात ३० जुलैला रात्री गुन्हा दाखल करून गोदाम सील करण्यात आले आहे. अमन अनिल श्रीवास (२६, रा. मसानगंज, अमरावती) याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना, अमन श्रीवास हा गोपालनगर येथील बंद सूतगिरणीच्या गोदामात रेशनच्या फोर्टिफाईड तांदळाची अवैध साठवणूक करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली. बातमीची शहानिशा करताच गुन्हे शाखेचे पीआय दिनेश दहातोंडे व पीआय अतुल वर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकासह सूतगिरणी परिसरातील गोदामावर छापा टाकला. गोदामाची पाहणी केली असता अमन श्रीवास याने सदर गोदाम लीजवर (भाड्याने) घेतले असून तांदूळ खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. मात्र, गोदामाची पाहणी केली असता, गोदाम क्रमांक एकमध्ये सुमारे ३५ ते ४० क्विंटल आणि गोदाम क्रमांक २ मध्ये सुमारे ७२ क्विंटल फोर्टिफाईड तांदूळ बेकायदेशीररीत्या साठवलेला आढळला. तसेच परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकमध्येही तांदूळ साठवलेला दिसून आला. दोन्ही गोदामे आणि दोन ट्रक मिळून एकूण ४५० क्विंटल तांदळाचे पोते (किंमत १८ लाख रुपये) आणि १५ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *