Headlines

"काही मदत हवी आहे का?", शरद पवारांनी घेतली दिपकेंची भेट:संवाद साधत जाणून घेतली सद्यस्थिती; महाराष्ट्रातील विरोधक विद्यार्थ्यांच्या पाठीशी




राजधानी दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले आहे. सोमवारी ‘चलो संसद’ आंदोलनाला देशभरातील तरुणांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. आजही दिल्लीत आंदोलन सुरूच असून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील दिल्लीत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आज अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाला आणखी धार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिजीत दिपके यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत माहिती दिली की, नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतरमंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या, अशी माहिती त्यांनी दिली आहे. सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा तसेच देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी देखील शरद पवारांनी केली आहे. शरद पवार आणि अभिजीत दिपकेंमध्ये काय संवाद झाला? शरद पवार यांनी अभिजीत दीपके यांची भेट घेतली असता, दीपके यांनी त्यांना आंदोलनाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना एकप्रकारे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत द्यावी, देशभरातील सर्व आंदोलकांवरील एफआयआर मागे घ्यावेत आणि सोनम वांगचुक यांची तत्काळ सुटका करावी, अशा प्रमुख मागण्या असल्याचे दीपके यांनी पवार यांच्यासमोर स्पष्ट केले. काही मदत हवी आहे का? शरद पवारांकडून अभिजीत दिपकेंना विचारणा यावेळी शरद पवारांनी अभिजीत दिपके यांना काही मदत हवी आहे का? अशी देखील विचारणा केली. त्यावर दिपके यांनी सांगितले की सर आम्हाला मदतीची गरज नाही. जे काही लागेल ते मी अनिशला सांगतो. त्यानंतर शरद पवारांनी विचारले की आणखी किती दिवस आंदोलन करणार? त्यावर दिपके म्हणाले की, आम्ही 31 दिवसांपासून इथेच आहोत. एक महिना झाला. काल जे झाले त्यामुळे सरकारचा राग आला आहे. आम्ही काय मागत होतो. आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो, असे दिपके यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विरोधक पहिल्या दिवसापासूनच आमच्या पाठीशी माध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विरोधक पहिल्या दिवसापासूनच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच नेते आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली आणि ते त्यांच्या स्थितीबाबत अत्यंत चिंतेत होते. तसेच, सुप्रिया सुळे यांनीही फोनवरून संपर्क साधला होता. मात्र, सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे पवार साहेबांना आत घेऊन जाणे शक्य झाले नाही. आतापर्यंत अनेक लोक आम्हाला भेटून गेले असून, यापुढेही सर्वांचा पाठिंबा आम्हाला मिळत राहील, असा विश्वासही दीपके यांनी यावेळी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *