![]()
“तुम्ही कुठे गेले होते, इतके दिवस कुठे राहत होते?’ असा जाब पत्नीने विचारल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शारदा मंगेश वारे (वय २४, रा. शेरी चिखलठाण) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे पती मंगेश प्रकाश वारे हे स्वतःच्या मालकीच्या पिकअप वाहनावर मालवाहतुकीचा व्यवसाय करतात. २९ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मंगेश वारे मालवाहतूक करून घरी आले. त्यावेळी पत्नीने, तुम्ही कुठे गेले होते, इतके दिवस कुठे राहत होते? अशी विचारणा केली. त्यावर मी कुठे जाईन, तुला काय करायचे, तू कोण विचारणारी? असे म्हणत पतीने शिवीगाळ सुरू केली. यानंतर लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी पत्नीला मारहाण करण्यात आली. तसेच माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर शारदा वारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी मंगेश प्रकाश वारे (रा. शेरी चिखलठाण, ता. राहुरी) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
Source link
"कुठे होता?' विचारताच पत्नीला लाकडी दांड्याने केली मारहाण:राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील घटना