![]()
महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना एक नवी आशा आणि जगण्याची नवी ऊर्जा देण्यासाठी आयोजित दिव्यांग शिबिरात तब्बल ३०० दिव्यांग बांधवांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय, हात आणि कॅलिपर्सचे वाटप करण्यात आले. यामुळे दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर ताठ मानेने उभे राहिले असून, त्यांच्या आयुष्याला नवी गती मिळाली आहे. येथील हरी ओम् लॉन्समध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. यांच्या सी.एस.आर. निधीतून, रोटरी क्लब ऑफ कळवण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारत विकास परिषदेच्या (दिव्यांग केंद्र, पुणे) वतीने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, भारत विकास परिषदेचे विश्वस्त विनय खटावकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, तहसीलदार रोहिदास वारुळे, आशा वेणुगोपाल, ज्ञानेश्वर शेवाळे, राजेंद्र भामरे उपस्थित होते.यावेळी डॉ. राजेश पाटील म्हणाले यांनी बाजारामध्ये ज्या अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पायाची किंमत तब्बल ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, तोच हायटेक पाय गरजू दिव्यांग बांधवांना पूर्णपणे मोफत मिळाला आहे. यामुळे अनेक जण पुन्हा एकदा स्वावलंबी जीवन जगायला सुरुवात करतील, असा विश्वास व्यक्त केला.माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी महागड्या उपचारांमुळे आणि कृत्रिम अवयवांच्या अवाढव्य खर्चामुळे अनेक दिव्यांग बांधव इच्छा असूनही कृत्रिम पाय किंवा हात घेऊ शकत नव्हते. मात्र, रोटरी क्लब आणि भारत विकास परिषदेच्या या पुढाकारामुळे एकाच छताखाली ३०० जणांचे स्वावलंबी होण्याचे स्वप्न साकार झाले असून, हे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. आभार रोटरीचे अध्यक्ष गणेश पाखले यांनी मानले.
Source link
कृत्रिम अवयवांमुळे 300 दिव्यांगांना नवी उमेद:रोटरी क्लब कळवण आणि भारत विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम