![]()
शेतीविषयीची अनास्था कमी करून शेती आणि शेतकऱ्यांना नवी प्रेरणा देण्याचे काम कृषी विज्ञान सेवा पुरस्कार करतील, असा विश्वास इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथे कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. नाशिक विभागाचे जलसंधारण अधीक्षक हरीभाऊ गिते आणि संरक्षण विभागातील शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांनी शासकीय नोकरीत असूनही शेतीशी नाळ जोडून ठेवली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांसाठी सुरू असलेले त्यांचे कार्य इतर नोकरदारांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार खोसकर म्हणाले. यंदा शेतकरी विभागातून विठ्ठल बाळाजी ढेरंगे, बद्रिनाथ इंदापुरे, प्रमिला फंड, शास्त्रज्ञ विभागातून डॉ. किशोर शिंदे, प्रा. तुषार उगले तर कृषीपूरक सेवा विभागातून वीरेंद्र थोरात, यूट्यूबर पल्लवी बोंगे आणि हवामानतज्ज्ञ दीपक जाधव यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डॉ. एल. के. गिते लिखित ‘मातीचा धनी – गोष्ट एका धाडसी बापाची’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे ‘शेती, युवक आणि कुटुंब’ या विषयावरील अंतर्मुख करायला लावणारे व्याख्यान झाले. शेती, कुटुंबव्यवस्था, तरुणाई आणि सामाजिक जबाबदारी यांचा परस्परसंबंध त्यांनी प्रभावीपणे मांडला. कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिवराम सांगळे, बाळासाहेब फड, नितीन सांगळे यांच्यासह संगमनेर आणि सिन्नर तालुक्यांतील शेतकरी, महिला, कामगार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
कृषी विज्ञान सेवा पुरस्कार शेतीला चालना देणारे ठरतील:आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केला विश्वास