Headlines

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप




केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दुसरीकडे, अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिल्याने दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तणावाच्या आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या चार युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना रात्रीच ताब्यात घेतले असून त्यांना डेक्कन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. भाजपचाही जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने थेट अमित शहांच्या दौऱ्यातच आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्सव हॉटेल चौकात जमायला सुरुवात केली आहे. मात्र, या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही रस्त्यावर उतरणार आहे. “काँग्रेस जिथे आंदोलन करेल, तिथे भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित राहतील,” असा इशारा भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यात आज भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. शहराला छावणीचे स्वरूप केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा आणि राजकीय पक्षांनी दिलेले आंदोलनाचे इशारे लक्षात घेता, पुणे पोलिसांकडून शहरात अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *