![]()
लोहगडाच्या कड्यावर नेमके काय घडले? केतन अग्रवाल दरीत कसा कोसळला? या प्रश्नांची उत्तरे शोधत असलेल्या पोलिसांच्या तपासात आता प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाचा महत्त्वाचा धागा समोर आला आहे. केतनला दरीत ढकलल्याचे पाहिल्याचा दावा करणाऱ्या या साक्षीदाराने घटनेनंतर पाच दिवसांनी, 23 जून रोजी पोलिसांकडे जबाब दिला. त्याहून धक्कादायक म्हणजे, घटनेनंतर चेतन चौधरीने आपल्यालाही किल्ल्यावरून फेकून देण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितल्याची माहिती तपासातील सूत्रांनी दिली. पोलिसांच्या हाती लागलेल्या 12 टीबी तांत्रिक डेटाने या प्रकरणाच्या तपासाला डिजिटल आधार दिला आहे. 6 मोबाईल, 9 पेनड्राइव्ह, बॅकअप, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया आणि डिलीट केलेल्या चॅटचा फॉरेन्सिक तपास करण्यात आला. काही डेटा हटवण्याचा प्रयत्न झाला असतानाही त्यातील माहिती पुन्हा प्राप्त झाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. आणखी एका व्यक्तीनेही चेतनला विचारले ‘हुडी का घातली?’ पोलिसांच्या तपासामध्ये आणखी एका साक्षीदाराने गड चढताना चेतनचा धक्का लागल्याचे सांगितले आहे. त्यानेही चेतनला हुडीबाबत विचारणा केली होती. त्यावेळी चेतनने माफी मागून पुढे गेल्याचे सांगण्यात येते. हुडीमुळे चेहरा लक्षात : प्रत्यक्षदर्शी प्रत्यक्षदर्शी त्याच्या मित्राच्या कुटुंबासोबत लोहगडावर फिरण्यासाठी आला होता. गड चढताना त्याने केतन आणि सियाला एकत्र जाताना पाहिले. काही अंतरावर चेतनही त्यांच्या मागे येत होता. उन्हाळ्यातही चेतनने हुडी घातली होती. त्यामुळे ‘इतक्या उन्हात हुडी का घातली?’ अशी विचारणा त्याने केल्याने चेतनचा चेहरा त्याच्या लक्षात राहिल्याचे जबाबात नमूद आहे. गडावर पोहोचल्यानंतर चेतन काही वेळ मंदिराजवळ बसला. त्यानंतर केतन आणि सिया पुढे गेल्यावर तोही त्यांच्या मागे गेला. प्रत्यक्षदर्शी लघुशंकेसाठी काही वेळ बाजूला गेला. त्याचे मित्र पुढे निघून गेले. तो पुढे जात असताना त्याचे लक्ष सियाकडे गेले. तिने बोटाने चेतनच्या दिशेने इशारा केला. यानंतर सिया खाली बसली आणि तिने केतनच्या पायावर लाथ मारल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. घटना समजल्यानंतर प्रत्यक्षदर्शी पोलिसांत ही घटना पाहिल्यानंतर प्रत्यक्षदर्शी चेतनच्या दिशेने गेला. त्याने याबाबत विचारणा केली. त्यावेळी ‘तू शांत बस, नाहीतर तुलाही किल्ल्यावरून असाच फेकून देईन’, अशी धमकी दिल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे. घाबरलेल्या साक्षीदाराने मित्र जवळ आल्यानंतरही त्यांना काही सांगितले नाही. गडावरून खाली आल्यानंतर तो घरी गेला. त्याला ताप आणि कणकण जाणवू लागल्याने तो काही दिवस घरातच राहिला. दरम्यान, माध्यमांमधून घटनेची माहिती समोर आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. डेटा डिलीट केला… तरीही हस्तगत केला आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट डेटा मिळवण्यावर पोलिसांनी भर दिला. आयफोनमधील डेटा कायमस्वरूपी कसा हटवायचा, चॅट हिस्टरी कशी डिलीट करायची आणि डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळू नये यासाठी कोणत्या पद्धती वापरता येतील, यासंबंधी सर्च केल्याचे तपासात आढळले. सियाने घरात लपवून ठेवलेला दुसरा मोबाईल फोडल्याची माहिती तपासात समोर आली. मात्र, त्याच्याशी संबंधित बॅकअप डेटामधून माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Source link
केतन अग्रवाल खून:‘तू शांत बस, नाहीतर तुलाही फेकूनदेईन’; चेतनची प्रत्यक्षदर्शीला धमकी, प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाने तपासाला मिळाले नवे वळण