![]()
केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या संबंधांबाबत नवी माहिती आली आहे. केतन सियाचे लग्न ठरण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बुकिंग करून मुक्काम केल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी संबंधित हॉटेलमधील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असून ओळखपत्रांच्या प्रतीही ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, नोव्हेंबर 2025मध्ये एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चेतनने ऑनलाइन बुकिंग केले होते. त्या वेळी त्याला 304 क्रमांकाची खोली देण्यात आली. हॉटेलमध्ये दाखल होताना चेतनने स्वतःचे आधारकार्ड, तर सियाचे वाहन चालवण्याचे लर्निंग लायसन्स ओळखपत्र म्हणून दिल्याचे हॉटेलच्या असिस्टंट फायनान्स मॅनेजरने पोलिसांना सांगितले आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास चेतन आणि सियाने खोली सोडल्याचेही जबाबात नमूद आहे. पोलिसांनी हॉटेलमधील दोघांच्या ओळखपत्रांच्या प्रती ताब्यात घेतल्या आहेत. यानंतर जानेवारी 2026मध्ये गुलटेकडी परिसरातील एका हॉटेलमध्येही दोघांनी बुकिंग करून मुक्काम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हॉटेलच्या व्यवस्थापकाचाही पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. तरुणीला रिलेशनशिपसाठी प्रवृत्त केले पोलिसांनी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींचेही जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी एक तरुणी लातूरची असून ती पुण्याबाहेरील एका मैत्रिणीसोबत राहत होती. 9 मे 2026 रोजी दोघी मैत्रिणी एकीच्या प्रियकरासह आणि चेतन चौधरीसोबत एस.बी. रोडवरील एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर दारू खूप प्यायल्याने रात्री उशिरा चौघे मार्केटयार्ड परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामासाठी गेले. मैत्रीण तिच्या प्रियकरासोबत एका खोलीत गेल्यानंतर संबंधित तरुणी चेतनसोबत दुसऱ्या खोलीत गेल्याचे पोलिसांच्या जबाबातून समोर आले आहे. या वेळी चेतनने तिच्याशी रिलेशनशिप ठेवण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दुसऱ्या दिवशी तिने ही बाब मैत्रिणीला सांगितली. तसेच चेतनने आपल्यासोबतही दोन-तीन वेळा रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न केल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. मोबाइल कंपनीत ओळखीची चाचपणी क्राइम ब्रँच किंवा मोबाइल कंपनीत कुणाची ओळख आहे का, अशी विचारणाही चेतनने केल्याचे मित्राने सांगितले. मात्र, संबंधित मित्राने पोलिसांत आपली कोणतीही ओळख नसल्याचे तसेच डिलीट केलेला डेटा पोलिसांना मिळू शकतो, असे चेतनला सांगितल्याचे जबाबात नमूद आहे. त्याच रात्री दोघांची भेट ठरली होती. मात्र कामामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेतन आणि सियाला अटक झाल्याची माहिती मिळाल्याचे या मित्राने पोलिसांना सांगितले आहे. चेतनकडून डिलीट डेटाची मित्राकडे चौकशी केतनच्या हत्येनंतरच्या तपासात चेतनने एका मित्राशी केलेल्या संभाषणाचीही पोलिसांनी नोंद घेतली आहे. 22 जून रोजी चेतनने खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या या मित्राशी संपर्क साधला. आपण मित्रासोबत लोणावळ्यात गेलो असताना मित्राच्या वाहनाने एका गाडीला धडक दिली आणि त्यानंतर तेथून निघून आल्याचे त्याने सांगितल्याचे जबाबात नमूद आहे. या घटनेनंतर गाडी क्रमांक आणि मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर त्रास दिला जात असल्याचे चेतनने मित्राला सांगितले. व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील चॅट डिलीट केल्यानंतर तो डेटा पोलिसांना पुन्हा मिळू शकतो का, अशी विचारणाही त्याने केल्याचे पोलिसांच्या नोंदीत आहे.
Source link
केतन अग्रवाल खून:सिया आणि चेतनचा पुण्यामधील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम, हॉटेल चालकांचे जबाब पोलिसांनी घेतले नोंदवून