Headlines

कोल्हापुरी बंधारा फुटल्याचा फटका:बोरगाव बाजार परिसरात पाणीटंचाई, विकत घ्यावे लागते पाणी; पिके, पशुधनही संकटात‎




बोरगाव बाजार गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गावात सुमारे १० ते १२ दिवसांनी एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या कमतरतेचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर शेतकरी आणि पशुपालकांनाही बसत आहे. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घटल्याने जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठीही पशुपालकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या संकटामागे बोरगाव बाजार परिसरातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा एक बाजूने फुटण्याचे प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे मत आहे. मागील वर्षी पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे हा बंधारा फुटला होता. मात्र, घटनेला अनेक महिने उलटूनही वारंवार पाठपुरावा करूनही बंधाऱ्याची पुनर्बांधणी झालेली नाही. बंधारा फुटल्यामुळे नदीपात्रात पाण्याचा साठा होऊ शकला नाही. पुरवठा सुरळीतसाठी प्रयत्न सुरू ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी महावितरणच्या लोडशेडिंगमुळे अडचणी वाढल्या आहेत. तीन-फेज वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा यंत्रणा चालविणे कठीण जात आहे. पंप सुरू करण्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध होत नसल्याने नियमित पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी फुटलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच कायमस्वरूपी जलसाठा व पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *