Headlines

कोल्हापूरहून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला:कराडजवळ कार-ट्रकच्या भीषण अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी




कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या तरुणांच्या गाडीला रविवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला आहे. साताऱ्यातील कराडनजीक पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने स्कॉर्पिओ कारला मागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत गाडीतील चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व तरुण साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील रहिवासी आहेत. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कातरखटाव गावातील हे ७ मित्र दसऱ्याच्या निमित्ताने रविवारी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून रात्री ते स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतत होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची गाडी कराडजवळील नवीन सहापदरी उड्डाणपुलावर आली असता, एका भरधाव ट्रकने त्यांना मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की स्कॉर्पिओ कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि आतील चौघांनी घटनास्थळीच प्राण सोडले. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे: या भीषण अपघातात गाडी चालवणारा तेजस देशमुख (वय २५), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) या चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमी मित्रांवर सध्या कराडमधील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावावर शोककळा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर एकाच गावातील चार उमद्या तरुणांचा असा अचानक आणि अपघाती मृत्यू झाल्याने कातरखटाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे. संपूर्ण गावात सध्या अत्यंत शोकाकुल वातावरण आहे. दरम्यान, ज्या उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला, तो सहापदरी पूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलावर झालेला हा पहिलाच मोठा अपघात असल्याने, येथील वाहतूक सुरक्षेबाबत आणि उपाययोजनांबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. —————– हेही वाचा.. दसऱ्याच्या दिवशी माण तालुक्यात वृद्धेची निर्घृण हत्या:पतीवरही धारदार शस्त्राने हल्ला, संशयित फरार दसऱ्याच्या सणादिवशी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मार्डी गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील पवार वस्तीवर राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली, तर त्यांचे 75 वर्षीय पती या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. साळूबाई मारुती पवार असे मृत महिलेचे नाव असून, मारुती शंकर पवार असे जखमी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दसऱ्याच्या सणादिवशी घडलेल्या या प्रकाराने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत एका संशयिताचे नाव समोर आले असून, तो सध्या फरार आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *