![]()
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमीचा सण शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथे पारंपरिक उत्साहात साजरा झाला. गावातील आबालवृद्धांनी एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात सीमोल्लंघन केले. शमीच्या वृक्षाचे विधिवत पूजन करून आपट्याची पाने लुटण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ही पाने देत ‘सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यातून गावातील सामाजिक एकोपा आणि परंपरेचे दर्शन घडले. सायंकाळी पाचच्या सुमारास ग्रामस्थ जगदंबा माता मंदिरासमोर एकत्र आले. तेथून हरिनामाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक गावाच्या वेशीबाहेरील शमीच्या वृक्षाकडे रवाना झाली. शमीपूजनानंतर आपट्याची पाने लुटण्याचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. त्यानंतर मंदिरांमध्ये दर्शन घेऊन परस्परांना दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या सीमोल्लंघन सोहळ्याला अशोक महाराज बोरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावचे सरपंच, उपसरपंच, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, देवस्थान ट्रस्टचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, ग्रामीण भागात दसऱ्यानिमित्त शेती अवजारांच्या पूजनाची परंपराही जपण्यात आली. शेतकऱ्यांनी नांगर, कुळव, विळा आणि ट्रॅक्टरची स्वच्छता करून पूजन केले. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना सजवून औक्षण करण्यात आले. निसर्गाची अनिश्चितता आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या आव्हानांमध्येही शेतात डोलणारे पीक हेच खरे ‘सोने’ मानत बळीराजाने नव्या आशेने समृद्धीचा संकल्प केला.
Source link
भावी निमगावात शमीपूजनाची परंपरा; आपट्याची पाने लुटून दिल्या शुभेच्छा:बौद्ध महासभेतर्फे सिद्धार्थ बुद्ध विहारात त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा