![]()
श्री साईबाबा समाधी मंदिरावरील सुवर्ण कळसाला ७४ वर्षे पूर्ण झाल्याने ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ झाला. यानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या वतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन आणि रुद्राभिषेक असे धार्मिक विधी करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी पत्नी पद्मिनी कचरे यांच्यासह सुवर्ण कळसाचे विधिवत पूजन व अर्चन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले आणि मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते. दरम्यान, साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीत दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सकाळी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि साईभक्त सहभागी झाले. त्यानंतर राधिका गोपालकृष्ण कालेकर यांचे कीर्तन झाले. समाधी मंदिरात आराधना विधी आणि माध्यान्ह आरती पार पडली. दुपारी दिल्लीचे गौतम अरोरा आणि श्रीरामपूरचे रोहित दुग्गल यांनी साईभजन सादर केले. सायंकाळी खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन, धूपारती आणि मुंबईचे संगीत दिग्दर्शक व गायक राम शंकर यांच्या साईभजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले. रात्री सव्वानऊच्या सुमारास गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री दहापासून पहाटे साडेपाचपर्यंत कलाकारांचा हजेरी कार्यक्रम झाला. उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने मंगळवारी रात्रीची शेजारती आणि बुधवारी पहाटेची काकड आरती झाली नाही. रात्रभर सुरू असलेल्या दर्शनामुळे भाविकांना साईसमाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.
Source link
साई मंदिराचा सुवर्ण कळस अमृत महोत्सवी वर्षात:पुण्यतिथी उत्सवात भिक्षा झोळी, भजनाने शिर्डी दुमदुमली