![]()
कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर उसाला दर देण्याचे आश्वासन देऊनही सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अपेक्षित दर जाहीर केला नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याबाहेर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी ऊस वाहतूक रोखून धरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही शेळके यांनी दिला आहे. कोल्हापूर पॅटर्नचे आश्वासन, मात्र साताऱ्यात वेगळीच भूमिका ऊस दराच्या प्रश्नावरून सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाला दिलेल्या दराप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनीही दर द्यावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. याच मुद्द्यावरून संघटनेने दिवाळीपूर्वी सातारा आणि कोल्हापूरदरम्यानच्या महामार्गावर आंदोलन केले होते. त्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल 3,900 रुपये प्रतिटन देण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच हंगाम संपल्यानंतर आणखी 100 रुपये आणि साखरेचा दर 45 रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास अतिरिक्त 200 रुपये देण्याची भूमिका मांडण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 4,200 रुपये प्रतिटन दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरप्रमाणे सांगली आणि सातारा जिल्ह्यातही उसाला दर मिळावा, अशी संघटनेची भूमिका कायम आहे. साताऱ्यातील कारखानदारांनी सुरुवातीला कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दर देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले; परंतु प्रत्यक्ष दर जाहीर करताना वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सात कारखान्यांकडून 3,800 रुपयांची पहिली उचल ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकांनंतर सातारा जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी उसाला 3,800 रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पत्रही जारी करण्यात आले आहे. पहिली उचल जाहीर करणाऱ्या कारखान्यांमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड (चिमणगाव, ता. कोरेगाव), अजिंक्य सहकारी साखर कारखाना (शाहूनगर, शेंद्रे), यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (रेठरे बुद्रुक, ता. कराड), जयवंत शुगर्स लिमिटेड, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (साखरवाडी, ता. फलटण) आणि शिवनेरी शुगर्स लिमिटेड (जयपूर, ता. कोरेगाव) यांचा समावेश आहे. या सात कारखान्यांनी 3,800 रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अपेक्षित असलेला कोल्हापूर पॅटर्न आणि साताऱ्यातील जाहीर झालेला दर यामध्ये तफावत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने या दरावर समाधान व्यक्त केलेले नाही. जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांशीही प्रशासनाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. कारखानदारांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न? दरम्यान, बाजारात साखरेला चांगला भाव मिळत असतानाही कारखानदार शेतकऱ्यांना योग्य दर देण्याबाबत निर्णय घेत नसल्याचा आरोप राजू शेळके यांनी केला आहे. ऊस दराच्या मागणीवर चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी कारखाना प्रशासन वाहनचालकांना पुढे करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असल्याचा दावाही त्यांनी केला. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी कारखानदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे केवळ पहिली उचल जाहीर करून प्रश्न सुटणार नाही, तर कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे योग्य दर देण्याबाबत स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार जरंडेश्वर कारखान्याबाहेर सुरू करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासन आणि कारखानदारांवर दबाव वाढवला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राजू शेळके यांनी केली आहे. उसाला योग्य भाव मिळेपर्यंत जिल्ह्यातील आंदोलन थांबवले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एका बाजूला सात कारखान्यांनी 3,800 रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केली आहे, तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना 4,200 रुपयांच्या कोल्हापूर पॅटर्नच्या मागणीवर ठाम आहे. आता जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदार या मागणीवर काय भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. जालन्यात कीर्तनानंतर मठात परतलेल्या महाराजांचा संशयास्पद मृत्यू:खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह, मोबाईल गायब जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका महाराजांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेले ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज (वय 41) रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले. पाताळेश्वर मंदिर परिसरातील त्यांच्या राहत्या खोलीत भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल फोनही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच वाढले असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. सविस्तर वाचा….
Source link
कोल्हापूर पॅटर्नच्या आश्वासनानंतरही साताऱ्यात कमी दर:राजू शेळकेंचा जरंडेश्वर कारखान्याबाहेर चक्काजाम, आंदोलनाचा इशारा