![]()
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या माध्यमातून शाळेचा परिसर नशामुक्त व तंबाखूमुक्त असावा या उद्देशाने अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांना अकोट ग्रामीण पोलिसांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे दिले. अभियानाबाबतीत येथील शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांसह विविध व्यसनांचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व, तसेच दारू, गुटखा या सारखे अनेक तंबाखूजन्य व नशायुक्त पदार्थ सेवन न करणे याबाबत ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस दलातर्फे “मिशन उडान’ उपक्रमांतर्गत अभियान राबवण्यात आले. ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्यसनमुक्ती बाबतीत तसेच मुलीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मुलींनी आवाज उठवला पाहिजे. मनात भिती बाळगायला नको व जर भिंतीयुक्त वातावरण निर्माण झाले तर त्वरीत पोलिसांची संपर्क साधावा अथवा ११२ या क्रमांकाचा वापर करावा म्हणजे आपल्याला त्वरित मदत मिळेल. विद्यार्थ्यांनी व युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी न पडता शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमाकडे वळून आपले जीवन सुखी करावे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला पोलिस कर्मचारी शिवकुमार तोमर, नीलेश खंडारे, सचिन कुलट, रितेश जयभाये, दामिनी वानखेडे, प्रतीक्षा शिवणकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र सोनटक्के, राजेंद्र मुऱ्हेकार, विनोद रसे, आनंद चंदनकर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.शंकर गवई यांनी मानले. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्याचा संकल्प कार्यक्रमातून “व्यसनमुक्त विद्यार्थी, सुरक्षित समाज’ हा संदेश देण्यात आला. सदर विद्यालयातील शिक्षकांनी या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याचा संकल्प केला. व शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना सुरक्षित व व्यसनमुक्त वातावरण मिळणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Source link
गणगणे विद्यालयात दिले व्यसनमुक्तीचे धडे:अकोट ग्रामीण पोलिसांनी केले मार्गदर्शन