Headlines

गैरसोय:कृषी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर; दिव्यांग, वयोवृद्धांची होते कसरत, रॅम्प, लिफ्टसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये संताप




सोयगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालय फर्दापूर रोड येथून १ डिसेंबर २०२५ रोजी सोयगाव शहरातील नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. मात्र, हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने दिव्यांग, वयोवृद्ध तसेच आजारी नागरिक आणि शेतकऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले कृषी कार्यालय सर्वांसाठी सुलभ असावे, अशी अपेक्षा असताना प्रवेशासाठीच अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सोयगाव तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून तालुक्याची लांबी सुमारे १२५ किलोमीटर आहे. त्यामुळे शासकीय कृषी योजनांशी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांना सोयगाव येथे यावे लागते. विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थींना कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जाणे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी केवळ कार्यालयात पोहोचण्याच्या अडचणीमुळे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी स्थलांतर? जुने तालुका कृषी अधिकारी कार्यालय फर्दापूर रोडवर होते. नवीन कार्यालयाच्या स्थलांतरामुळे सर्वसामान्य नागरिकांची सोय झाली की केवळ लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या सोयीचा विचार करण्यात आला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कार्यालय स्थलांतराचा निर्णय घेताना दिव्यांग, वयोवृद्ध आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सुलभ प्रवेशाचा विचार करण्यात आला होता का, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. रॅम्प, लिफ्टसह सुविधांची गरज शासकीय कार्यालयीन इमारतीमध्ये दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेशाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. मुख्य प्रवेशद्वारावर रॅम्प, एकापेक्षा अधिक मजले असल्यास व्हीलचेअर सहज जाऊ शकेल अशी लिफ्ट, लिफ्टमध्ये ब्रेल लिपीतील बटणे, दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय तसेच दृष्टिहीन व्यक्तींना मार्गक्रमण करता यावे यासाठी स्पर्शात्मक मार्ग अशा मूलभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, कृषी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या सुविधांअभावी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे. लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. खालच्या मजल्यावर दिव्यांग कक्ष तयार करणार दिव्यांग व वयोवृद्ध शेतकरी यांच्यासाठी खालच्या मजल्यावर दिव्यांग कक्ष तयार करण्यात येणार असून त्यासाठी आकस्मिक निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे.” -भरत कासार, तालुका कृषी अधिकारी सोयगाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *