Headlines

गैरसोय:14 वर्षांपासून आरोग्य उपकेंद्राची इमारत धूळ खात; रुग्णांवर खासगी उपचारांचा भार




तालुक्यातील घोसला येथे ताप, थंडी वाजणे आदी लक्षणांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गावातील शासकीय आरोग्य व्यवस्था मात्र कागदावरच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांत १५ हून अधिक रुग्णांना तापाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत अस्तित्वात असतानाही तेथे नियमित अधिकारी-कर्मचारी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे घोसल्यासह परिसरातील तब्बल सात गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पार ऐरणीवर आला आहे. सध्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीच्या मागील बाजूची संरक्षण भिंतही कोसळली आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. लाखो रुपये खर्चून उभारलेली ही वास्तू रुग्णांच्या उपयोगात येत नसल्याने शासनाच्या निधीचा नेमका उपयोग कोणासाठी झाला, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. घोसला गावात लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गावात शासकीय उपकेंद्र असूनही ते बंदप्राय असल्याने रुग्णांना उपचारासाठी पाचोरा तसेच पिंपळगाव (हरे) येथील खासगी दवाखान्यांत जावे लागत आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबांवर उपचाराचा अतिरिक्त आर्थिक आणि मानसिक भार पडत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी घोसला येथील उपकेंद्राची सायंकाळी पाहणी केली होती. त्यावेळी नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पंचायत समिती सदस्य श्रीमती सविता सोपान गव्हांडे यांनी २० मार्च २०२६ रोजी उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर १६ जुलै २०२६ रोजी आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांनी कार्यवाहीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांना पत्रही पाठवले. मात्र, या सर्व वरिष्ठ स्तरावरील पत्रव्यवहारानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ८५ लाखांचा निधी खर्च, सुविधा शून्य घोसला येथे सन २०१२ मध्ये आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारण्यात आली. त्यासाठी शासनाकडून सुमारे ८० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, इमारत उभारल्यानंतरही ती अपेक्षित पद्धतीने कार्यान्वित झालीच नाही. तब्बल १० वर्षे इमारत वापराविना पडून राहिल्यानंतर सन २०२२ मध्ये मराठा प्रतिष्ठानचे सोपान गव्हांडे यांच्या पाठपुराव्यामुळे दुरुस्तीसाठी पुन्हा ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, निधीचा हा फेरफार होऊनही उपकेंद्रात नियमित आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाले नसल्याची तीव्र तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. १५० घरांचा सर्व्हे, तापाची स्थिती नियंत्रणात; रक्त व पाण्याचे नमुने घेतले Ãघोसला आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची भिंत पडली होती. त्याबाबत बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. तसेच वीजपुरवठ्यासाठी महावितरणलाही पत्र दिले आहे. उपकेंद्र परिसरात दोन दिवसांत स्वच्छता करून घेतली जाईल. बाहेरील परिसर स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीला यापूर्वी पत्र दिले होते; मात्र दखल न घेतल्याने पुन्हा पत्र देण्यात येईल. परिचारिका पदे रिक्त असून त्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. गावात आरोग्य सहायक नियमित जात आहे. आज १५० घरांचा सर्वे केला असता तीन तापाचे रुग्ण आढळले असून तिन्ही रुग्णांचे रक्त नमुने तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. -डॉ. गितेश चावडा, तालुका आरोग्य अधिकारी, सोयगाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *