![]()
गोंदिया शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी घराबाहेर उभ्या असलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर ५ ते ६ मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुदैवाने एका सतर्क शेजाऱ्याने वेळीच धाव घेतल्याने या मुलीचा जीव वाचला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे चिमुकली प्रचंड दहशतीखाली असून, हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शाळेत जाण्यापूर्वीच घटना ही घटना गोंदिया शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रिंग रोडवरील मजारच्या पाठीमागे सकाळी घडली. ७ वर्षांची ही चिमुकली शाळेच्या गणवेशात तयार होऊन शाळेत जाण्यासाठी आपल्या घराबाहेर उभी होती. याचवेळी अचानक ५ ते ६ मोकाट कुत्र्यांच्या एका कळपाने तिच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली आणि तिने जिवाच्या आकांताने किंचाळायला सुरुवात केली. आरडाओरड ऐकताच शेजारी धावले अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुलगी मोठ्याने ओरडू लागली. तिचा आक्रोश ऐकून शेजारी तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत मुलीची सुटका केली. शेजाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. काही क्षण उशीर झाला असता, मुलीच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मुलीला मानसिक धक्का, खासगी रुग्णालयात उपचार सुरू या हल्ल्यात सुदैवाने मुलीला फार गंभीर शारीरिक दुखापत झाली नाही, मात्र ५-६ कुत्र्यांनी अचानक अंगावर हल्ला केल्याने ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. या घटनेनंतर मुलीला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार आणि निरीक्षण सुरू आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांचे रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. या ताज्या घटनेमुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नगरपालिकेने तातडीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. हेही वाचा.. संभाजीनगर-इचलकरंजी बसला भीषण आग: चालकाच्या प्रसंगावधानामुळे 38 प्रवाशांची सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि बाजूने जाणाऱ्या कारमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सविस्तर वाचा
Source link
गोंदियात मोकाट कुत्र्यांची दहशत:घराबाहेर उभ्या असलेल्या शाळकरी मुलीवर 5-6 कुत्र्यांचा हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद