![]()
येथील वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरातील श्री निलमणी मूर्तीची पालखीतून पुणेरी थाटात मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे सलग ३० व्या वर्षी या स्थापना मिरवणुकीचे आयोजन करण्या
.
या पालखी मिरवणुकीचा आरंभ निलमणी गणेश मंडळाचे राजेश निकुंभ यांनी श्रीफळ वाढवून केला. संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या मिरवणुकीत मिरवणूक मार्गावर सुशोभित रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच पालखीच्या समोर चंद्र-सूर्य व भगवा ध्वज (मानाची अब्दागिरी), सनई-चौघडा व वाद्यवृंद लावण्यात आले होते. मिरवणुकीत शंखनादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर दुमदूमला.
मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सडा-रांगोळ्या घालण्यात आल्या. सुवासिनींनी औक्षण करून पालखीचे स्वागत केले. पुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात ट्रस्टचे विश्वस्त शेखर पांगुळ यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. या मिरवणुकीत श्री निलमणी गणेश सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष किशोर गुजराथी, सचिव नितिन पांडे, गोविंद रसाळ, प्रज्ञेश खांदाट यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. निलमणी गणेशाच्या पालखीसमोर वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. बारा दिवस निलमणी गणेश मंदिरात दररोज सकाळी महाअभिषेक, आठ वाजता महाआरती व दोन्ही वेळेस सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी | चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी आगमन मिरवणुका काढून आपल्या गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या ‘वरचे गावचा राजा’चा मुखदर्शन व आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. या मंडळाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असलेला महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बालगोपाळांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजता नंदुरबार येथून निघालेल्या ‘वरचे गावचा राजा’च्या सुमारे १५ फुटी भव्य गणेशमूर्तीचे सुमारे १५ तासांनंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरात आगमन झाले. रविवारी (दि. १३) सायंकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ‘वरचे गावचा राजा’च्या आगमन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत डीजे पथक, महाबली हनुमान देखावा, बालाजी देखावा, भगवान शिवशंकराचे रूप, ढोल-ताशांच्या तालावर अघोरी नृत्य करणारे साधू, महाकाली देखावा यांसह नाशिक येथील सुमारे १०० सदस्यांचे ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. महाकाल यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रूप, कांतारा, कालिकादेवी, महाकाली, शिवपार्वती व अघोरींचे नृत्य चांदवडकरांनी अनुभवले. पथकाने सादर केलेल्या अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी शहरातील रस्ते नागरिकांच्या गर्दीने भरले होते. या मिरवणुकीत तलवारबाजी, लाठी-काठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांच्या प्रदर्शनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठवडे बाजारतळ, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, शिंपी गल्लीमार्गे सुमारे पाच तासांनंतर मिरवणुकीची वरचे गाव येथे सांगता झाली. यावेळी गणेशाच्या मुखदर्शनप्रसंगी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी गणेशमूर्ती असल्याने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या आठवडे बाजारजवळील पुरातन वेशीतून गणेशमूर्ती आत आणताना गणेशभक्तांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आगमन मिरवणूक काही काळ लांबली होती. मात्र, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत अडचणींवर मात करत मूर्तींचा शहरात निर्विघ्न प्रवेश केला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या मंडळांकडून प्रतिष्ठापना संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या मंडळासह शहरातील त्रिलोक गणेश मित्र मंडळ, संत गाडगेबाबा चौक गणेश मित्र मंडळ, हिंदुराजा गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा फ्रेंड सर्कल आदी विविध मंडळांचाही गणेश आगमन सोहळा वाजतगाजत, डीजेच्या निनादात पार पडला. या मंडळांनीही भव्य गणेशमूर्तींची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळून निघालेल्या गणेश आगमन मिरवणुकांची मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनास्थळी सांगता झाली.