Headlines

चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू:लपंडाव खेळताना न्यु शिक्षण कॉलनीत घडली घटना, पोलिसांत नोंद‎




लहानग्याचे हसणे-खेळणे आणि मित्रांसोबतचा तो निरागस खेळ. कोणाला ठाऊक होते की हा खेळ कार्तिकच्या आयुष्याचा शेवटचा खेळ ठरेल? शहरातील अकोली मार्गावरील न्यू शिक्षक कॉलनीमध्ये रविवारी (दि. २६) रात्री काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. मित्रांसोबत लपंडाव खेळताना आठ वर्षांचा चिमुकला कार्तिक अमोल ठाकरे याचा एका उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून करुण अंत झाला. कार्तिक रविवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबतघराबाहेर लपंडाव खेळत होता. रात्री आठच्या सुमारास मित्रांच्या नजरेतून लपण्यासाठी कार्तिक जवळच असलेल्या एका निर्माणाधीन घराच्या दिशेने धावला. त्या घराचे बांधकाम अर्धवट असल्याने तिथे एक सेफ्टी टँक खोदलेला होता, ज्यात पाणी भरलेले होते. त्या ठिकाणी अंधार असल्याने धावणाऱ्या कार्तिकला त्या धोक्याचा अंदाज आला नाही. तो थेट त्या पाण्याने भरलेल्या खोल टाक्यात कोसळला. बराच वेळ झाला तरी कार्तिक घरी परतला नाही, तसेच खेळणाऱ्या मित्रांमध्येही तो कुठे दिसेनासा झाला, सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. शोधत असताना निर्माणाधीन घरातील सेफ्टी टँकबाहेर कार्तिकची चप्पल दिसली. संशय आल्याने टॉर्चच्या प्रकाशात त्या सेफ्टी टँकमध्ये पाहिले असता, कार्तिक पाण्यावर तरंगताना आढळला. उपस्थितांनी तातडीने त्याला बाहेर काढून खासगी रुग्णालयात नेले, मात्र काळाने आधीच घाला घातला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कार्तिक पडला तो टँक सुमारे सहा फुट खोल होता. त्यामध्ये पाच फुट पाणी भरलेले होते. चिमुकला आठ वर्षीय कार्तिकच्या उंचीपेक्षा पाणी अधिक असल्यामुळे कार्तिक त्या पाण्यात बुडाला. शिवाय या घरात अंधार असल्यामुळे कार्तिक पडल्याचा कोणाला अंदाज आला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *