Headlines

चेहऱ्यासह धड गायब:‘इर्विन’मध्ये आढळले मानवी हात, पाय, रुग्णालयातील थरारक दृश्याने हादरले उपस्थित




रुग्णांना जीवनदान देणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) गुरुवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा आणि व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार उघडकीस आला. वॉर्ड क्रमांक १० च्या समोर तुटलेले मानवी अवयव दिसताच संपूर्ण इर्विन परिसर हादरून गेला. एका बाजूला हात, दुसऱ्या बाजूला पाय तर काही अंतरावर डोक्याचा कुरतडलेला भाग, पण चेहरा आणि धड मात्र गायब आहे. या भयावह दृश्याने रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडला आहे. नेहमीप्रमाणे रुग्णालयात धावपळ सुरू असतानाच, सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वॉर्ड क्रमांक १० समोर एका कर्मचाऱ्याची नजर जमिनीवर पडलेल्या एका वस्तूवर गेली. जवळ जाऊन पाहताच एका माणसाचा अर्धवट तुटलेला पाय होता. माहीती मिळताच कोतवालीचे ठाणेदार रोशन शिरसाठ ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पहिल्या पायापासून काही अंतरावरच अर्धवट उजवा पाय, पुढे अर्धवट डावा हात, तर काही अंतरावर डोक्याचा आणि चेहऱ्याचा कुरतडलेला भाग आढळून आला. भटक्या श्वानांनी या मृतदेहाचे लचके तोडून हे अवयव इकडे-तिकडे फरफटत आणल्याचा अंदाज आहे. ओळख पटवण्याचा प्रयत्न ^मानवी अवयव आढळल्यानंतर आम्ही इर्विन परिसरातील तसेच बाहेरील भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे. मृतदेहाचा जो भाग अद्याप मिळालेला नाही, त्याचाही आम्ही कसून शोध घेत आहोत. – रोशन शिरसाठ, ठाणेदार, कोतवाली पोलिस ठाणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *