Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 अतिक्रमणे जमीनदोस्त:शहानुरमिया दर्गा रोडवरील फळविक्रेते, चायनीज चौपाटी हटवली; मनपाची कारवाई




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने (मनपा) शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम तीव्र केली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मनपाच्या पथकाने शहरात कारवाई करत १२० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. बुधवारी १४० अतिक्रमणे हटवण्यात आली होती. ही कारवाई वाढत्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी करण्यात येत आहे. आजची कारवाई प्रामुख्याने शहानूर मियां दर्गा परिसरापासून ते भाजीवाली बाई पुतळ्यापर्यंत राबवण्यात आली. यानंतर ही मोहीम आनंद गाढे चौकापर्यंत पुढे नेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. रस्त्यावर अनधिकृतपणे थाटण्यात आलेले फळविक्रेत्यांचे गाडे, शेड आणि चायनीज सेंटर्स या कारवाईत पूर्णपणे हटवण्यात आले. यामुळे रस्त्यावरील अडथळे दूर होऊन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाला आहे. शहानूर मियां दर्गा परिसरात या कारवाईला काही स्थानिक आणि व्यावसायिकांनी विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत कारवाई पूर्ण केली. मनपा उपआयुक्त संतोष वाहूळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत १२० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सविता सोनवणे आणि त्यांच्या पथकाने रस्त्यावरील हे अनधिकृत अडथळे हटवून शहर मोकळे श्वास घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. यापुढेही रस्त्यावरील अतिक्रमणांवर अशीच कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *