![]()
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन व सेवा व्यवस्था आहे. सेवा, समर्पण आणि सुरक्षा या त्रिसूत्रीच्या बळावर एसटीने राज्यातील दुर्गम गाव-खेड्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले आहे. एसटी केवळ एक वाहन नसून, ती प्रत्येक मराठी माणसाच्या कुटुंबातील हक्काचा सदस्य झाली आहे, असे गौरवद्गार ज्येष्ठ प्रवासी महेंद्र काशीनंद यांनी काढले. कन्नड आगारात महामंडळाचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर-धुळे मार्गावर १४ ‘शिवाई’ ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्ताने कन्नड आगारात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख प्रवासी म्हणून महेंद्र काशीनंद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक विजय काळवणे, वाहतूक निरीक्षक सागर पाटील, लेखाकर वृंदा विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आगार व्यवस्थापक विजय काळवणे म्हणाले की, एसटी महामंडळाने सामाजिक बांधीलकी जपत प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या ३० पेक्षा अधिक सवलती लागू केल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सवलती देऊनही योग्य नियोजन आणि प्रवाशांच्या विश्वासामुळे महामंडळ आज फायद्यात चालत आहे. बसस्थानकावर प्रवाशांना पुष्प आणि पेढे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कन्नड आगारातून दर तासाला छत्रपती संभाजीनगर ते धुळे या मार्गिकेवर धावणाऱ्या १४ अत्याधुनिक ‘शिवाई’ वातानुकूलित ई-बसेसचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेत विनाअपघात सेवा देणाऱ्या ५१ चालकांचा प्रत्येकी दीड हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी डॉ. नितीन सरवदे यांनी चालक व वाहकांची मोफत दंततपासणी केली. या सोहळ्याला सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्रीराम पवार, वाहतूक नियंत्रक भाऊलाल सुर्वे, जगन्नाथ पांडव, अंकुश गाडेकर, गणेश खंडागळे, अमोल भिंगारे, अतुल महेर, प्रवीण चरावंडे, श्रीकृष्ण बडग, आकाश बोलधने, गोकुळ राठोड, अकीब शेख, महेश कुलकर्णी, कदीर शेख, मोरे, विजय चव्हाण, अल्तमश शेख, पवन साळवे यांच्यासह आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार संघर्ष पगारे यांनी मानले. यावेळी प्रवासी उपस्थित होते. पिशोर, नागद, करंजखेड, चिंचोली येथे कार्यक्रम कन्नड आगारासह अंतर्गत येणाऱ्या पिशोर, नागद, करंजखेड आणि चिंचोली येथील बसस्थानकांवरही वर्धापन दिन साजरा झाला. या ठिकाणी बसस्थानक परिसरात आकर्षक रांगोळी काढून, सडा टाकून आणि आंब्याचे तोरण बांधण्यात आले होते . हे मुख्य बसस्थानक माजी आमदार बाबुरावजी औराळकर यांनी बांधले असल्याने, या आगाराला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी स्वप्नील औराळकर व चेतन महाले यांनी यावेळी केली.
Source link
छत्रपती संभाजीनगर-धुळे मार्गावर 14 ‘शिवाई' ई-बसेसचे लोकार्पण:78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, 51 चालकांचा केला सत्कार