![]()
पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एका अनोळखी चोरट्याने ही चोरी केली असून, या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 40 वर्षीय महिला 30 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्या कक्षात आला. त्याने स्वतःला रुग्णालयाचा कर्मचारी भासवून महिलेला प्रसाधनगृहात जाण्यास सांगितले. महिला प्रसाधनगृहात गेल्यानंतर चोरट्याने तिच्या पिशवीत ठेवलेली 16 हजार 500 रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले चोरून नेली. प्रसाधनगृहातून परत आल्यानंतर महिलेने पिशवी तपासली असता, दागिने चोरीला गेल्याचे तिच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात प्रवेशासाठी तपासणी आणि नावनोंदणी केली जाते. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, पोलीस हवालदार एस. पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रोहित्रांची तोडफोड करून त्यातील तांब्याचा तारा चोरी दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मांजरी आणि लोणीकंद परिसरात महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करून त्यातील तांब्याची तार चोरून नेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मांजरी भागातील सोमनाथ पोल्ट्री फार्मजवळ असलेल्या रोहित्राची तोडफोड करून 580 किलो तांब्याची तार चोरण्यात आली. या तारांची किंमत 75 हजार रुपये असून, तोडफोडीमुळे रोहित्राचेही मोठे नुकसान झाले आहे. महावितरणचे कर्मचारी कैलास ताम्हाणे (वय 36) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार विठ्ठल घुले या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद भागातील हिंगणगावातील रोहित्राची तोडफोड करून चोरट्यांनी 320 किलो तांब्याची तार चोरून नेली. या तोडफोडीत रोहित्रातील 840 लिटर ऑईलही सांडले. महावितरणचे कर्मचारी बालाजी मुरकुटे (वय 42) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Source link
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचे दागिने चोरी:कोरेगाव पार्क पोलिसांकडून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल