Headlines

जरांगेंच्या आंदोलनापुढे सरकार पूर्णपणे झुकले:सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला; फडणवीसांनी ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली- हाके




मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीच्या आंदोलनासमोर हे सरकार पूर्णपणे झुकले असून, त्यांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. या लोकनियुक्त सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. लक्ष्मण हाके म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला अर्थसंकल्पात 50 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या तोंडाला पाने पुसत 1 टक्क्यापेक्षाही कमी निधी दिला. सरकारने केवळ निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने अनेक महामंडळांची घोषणा केली. पण आज या महामंडळांना ना निधी मिळाला आहे, ना हक्काचा सचिव. हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. जरांगे कुठल्या सभागृहाचे लोकप्रतिनिधी? लक्ष्मण हाके म्हणाले की, प्रसाद लाड नावाचा आमदार म्हणतो की ‘हत्ती अख्खा गेला आणि आता फक्त शेपूट राहिले आहे. लाड यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावे. हॉटेलवाली, झाडूपोछा करणारी टीनपाठ माणसे जरांगेचे उंबरठे झिजवत आहेत. लाड यांच्यासारख्या नेत्याला जरांगेंकडे पाठवून सरकारने स्वतःचाच ‘सेल्फ गोल’ केला आहे. माझी पात्रता विचारणाऱ्या लाड यांनी आधी सांगावे की मनोज जरांगे कुठल्या सभागृहाचे लोकप्रतिनिधी आहेत? असा थेट सवाल त्यांनी केला. आमचा हक्काचा निधी डावलला जातोय लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही यापूर्वीच राजेश टोपे यांना थेट आव्हान दिले होते, आज त्यांना स्वतःच्या मतदारसंघात एक सरपंचही निवडून आणता आलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला. सातसमुद्रापारून आलेल्या इंग्रजांनी या देशात जातनिहाय जनगणना करण्याची हिंमत दाखवली, पण स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना ती करता आली नाही. आमच्याकडे अचूक इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसींची नेमकी संख्या मोजली जात नाही. त्यामुळेच आमचा हक्काचा निधी डावलला जात आहे. पवार कुटुंबावर टीका लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘पवार प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी करून टाकली आहे. तर दुसरीकडे, शरद पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेच्या घटनेत सोयीस्कर बदल करून स्वतः अध्यक्षपद पटकावले आणि रोहित पवारांना उत्तर विभागाचे अध्यक्ष केले. भाजप सध्या ‘जेन झी’ पिढीला आणि कॉकरोज जनता पार्टीला प्रचंड घाबरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *