![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात टेबल टाकून वाढदिवसाचा केक कापल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सदर पदाधिकारी व त्याच्या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, किशोर राजाराम विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. किशोर विटकर हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. येरवड्यातील गाडीतळ परिसरात त्यांचे संपर्क कार्यालय आहे. त्यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. या निमित्ताने मध्यरात्री 1 च्या सुमारास त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयापुढील मुख्य रस्त्यावर टेबल टाकून केक कापला. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यामु्ळे रहदारीला अडथळा निर्माण झाला. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजीही केली. मध्यरात्री झालेल्या या आतषबाजीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला. तसेच रस्त्यावर टेबल टाकल्यामुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला. पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक किशोर राजाराम विटकर (51) व त्यांचा मुलगा हर्षद किशोर विटकर (28) यांच्यासह गणेश पोपटराव ढोकळे (40), गणपत जिवराज पुरोहित (51), विकास मच्छिंद्र सोनवणे (40), रोहित मधुकर वैराळ (35) व रामेश्वर अरुण दुर्लेकर (32) यांच्यावर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी बलजीत थोरात यांनी तक्रार दिली आहे. ‘माझ्यासोबत का राहत नाहीस’ म्हणत तरुणीवर अॅसिड हल्ला दुसरीकडे, एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला केल्याची घटना पुण्यात दोन दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांनी हल्लेखोर श्रीराम मधु सरुनवर (30) याच्या कर्नाटकातून मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची 21 वर्षीय मैत्रीण दुसऱ्या एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्याचा राग आरोपीला आला होता. या रागातूनच त्याने 20 मे रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्यावर अॅसिड हल्ला केला. हा सर्व प्रकार पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात घडला. पीडित तरुणी व तिचा मित्र हे दोघेही पुण्याच्या एका हॉटेलात काम करतात. काम संपल्यानंतर हे दोघेही बुधवारी पहाटे ताडीवाला रोड येथील आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. रस्त्यात आरोपी श्रीराम सरुनवर दबा धरून बसला होता. तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही तर कुणाचीच नाहीस, असे म्हणत त्याने पीडित तरुणीवर आपल्या हातातील ज्वलनशील पदार्थाने हल्ला केला. त्यात तरुणीची मान, पाठ व दोन्ही पाय होरपळले. या घटनेत तरुणीच्या मित्राच्या पायालाही इजा झाली.
Source link