![]()
मराठवाड्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाची चिंता लागलेल्या बळीराजासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांतून दोन दिवसांपूर्वी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या दोन्
.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सध्या २२०० क्युसेक, तर पैठण उजव्या कालव्यातून ११०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. दोन्ही कालव्यांतून मिळून ३३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात पहिल्या आवर्तनातून सुमारे ५८ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे. प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा यांसारखी भुसार पिके तसेच जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चारा पिकांना या पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे. संपूर्ण रब्बी हंगामासाठी एकूण तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि प्रभावी वितरण झाल्यास शेती उत्पादनाला मोठा हातभार लागेल, असे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.
डावा कालवा २०८ किमी जायकवाडीच्या डाव्या कालव्याची लांबी २०८ किलोमीटर असून, त्याची वहन क्षमता २००.०६ घनमीटर प्रतिसेकंद आणि निव्वळ सिंचनक्षमता १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर इतकी आहे. तर, उजव्या कालव्याची लांबी १३२ किलोमीटर असून, वहन क्षमता ६३.७९ घनमीटर प्रतिसेकंद आणि सिंचनक्षमता ४१ हजार ६८२ हेक्टर एकूण सिंचन क्षेत्र ४६ हजार ६४० हेक्टर) आहे. पहिल्या रब्बी आवर्तनातून ५८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
रब्बी हंगामातील पिकांना जीवदान पाणी सोडण्यात आल्याने पैठण तालुक्यासह जालना जिल्ह्यात ३६,३०० हेक्टर, परभणी १,५६,१२५ हेक्टर, बीड ६६,७१६ हेक्टर तर अहिल्यानगर जिल्ह्यात ५,५७७ हेक्टर व नांदेड जिल्ह्यात ७,२०० हेक्टर असे डाव्या कालव्याचे १,४१,६४० हेक्टर, उजव्या कालव्याचे ४६,६४० हेक्टर आणि इतर ९३,८८५ हेक्टर मिळून एकूण २,८२,१६५ हेक्टर सिंचन क्षेत्र या प्रकल्पांतर्गत येते. या पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास शेतकऱ्यांना अधिक दिलासा मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितू परदेशी यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी सिंचन १२ नोव्हेंबरला नाथसागर जलाशयात २२५३.२०२ दलघमी ७९.५६ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी १५१५.०९६ दलघमी ५३.५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ६९.७९ इतकी आहे. या जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या सिंचनासाठीही काटेकोर नियोजन करणे शक्य झाले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी दिली. दरम्यान, प्रशासनाकडून पाणी सोडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.