![]()
जिल्हा परिषदेतील कनिष्ठ आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे आता ‘एस-१४’ या एकाच संवर्गात एकत्र केली जाणार आहेत. यामुळे एकाही लिपिकाचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. या निर्णयाचा फायदा अमरावतीसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकांना होणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेची राज्यस्तरीय संवाद बैठक नुकतीच सांगली येथे पार पडली. या बैठकीत राज्यातील १९ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन पदे ‘एस-१४’ मध्ये एकत्र करण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे बाबर यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना राज्याचे कार्याध्यक्ष तथा अमरावतीचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी वेतन निश्चितीबाबत माहिती दिली. दोन पदे एकत्र केल्यामुळे ‘एस-१३’ ऐवजी ‘एस-१४’ मध्ये सुधारित वेतननिश्चिती करताना कर्मचाऱ्याचे वेतन कमी झाल्यास, पुढील टप्प्यात वेतन निश्चिती करण्याचे स्पष्ट शासन निर्देश आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे लिपिकांच्या वेतनत्रुटी दूर करणे, ग्रेड वेतन वाढवणे आणि पदोन्नतीचे टप्पे कमी करणे यासारख्या अनेक मागण्या मान्य झाल्याचे राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच, येत्या एक-दोन महिन्यांत सांगली येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. या अधिवेशनात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार सत्यजित देशमुख आणि आमदार सुहास बाबर यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. लिपिकांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर तळमळीने नेतृत्व करणारे लिपिक शिरोमणी दिवंगत बापूसाहेब कुलकर्णी यांना मरणोत्तर ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्ती झाल्याबद्दल सांगली जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांचा, तसेच विविध पतसंस्थांवर चेअरमनपदी निवड झालेल्या लिपिकांचा आणि नवनियुक्त नांदेड जिल्हाध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला. राज्य सचिव अरुण जोर्वेकर आणि राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर राज्याध्यक्षांनी लिपिकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. बैठकीचे प्रास्ताविक विशाल पाटील यांनी केले, सूत्रसंचालन सहसचिव सायली कुलकर्णी व जिल्हा समन्वयक अशोक लोहार यांनी केले, तर आभार राज्य संघटक ओंकार वंजारी यांनी मानले.
Source link
जिल्हा परिषदेतील लिपिकांसाठी आता एकच संवर्ग:सांगली बैठकीत निर्णय, अमरावतीसह राज्याला फायदा