![]()
शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीची धूळ बसते न बसते तोवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा धुराळा उडायला लागला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे. सोमवारी पंढरपुरात पांडुरंग परिवाराची जिल्हा बँकेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला. ही बैठक संपण्याच्या वेळी विरोधी गटाकडून जिल्ह्यातील नेत्यांची मोट बांधत असलेल्या माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी परिचारक बंधूंची भेट घेतली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रशांत परिचारक यांच्याकडे मागे ज्याप्रमाणे राजकारण बाजूला ठेवत जुन्या नेत्यांनी जिल्हा बँकेचा कारभार पाहिला. त्याच धर्तीवर एकत्र येत सर्वांना सोबत घेऊन बँकेची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र तो नाकारत पक्षाचा आदेश पाळणार आहे, असे परिचारकांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात बँकेचे राजकारण कोणते वळण घेते हे पाहावे लागणार आहे. बैठक संपल्यानंतर परिचारक गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह अचानक तेथे दाखल झाले. मोहिते-पाटील यांनी प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांची भेट घेत त्यांच्याशी जिल्हा बँकेसंदर्भातील चर्चा करण्याची विनंती त्यांनी केली. त्यानंतर परिचारक बंधूंसोबत बंद खोलीत चर्चा झाली. मोहिते-पाटील यांच्याकडून दुसऱ्या फळीच्या नेत्यांची बांधणी करण्यात येत आहेत. त्याच बरोबर पक्षभेद सोडून जुन्या मित्रांची एकत्र मोट बांधण्याची तयारी करण्यात येत आहे. शनिवारी झालेल्या अकलूजमधील बैठकीनंतर सोमवारी पंढरीत प्रशांत परिचारकांची घेतलेली भेट ही त्याच रणनीतीचा भाग असल्याचे दिसते. पंढरपूरच्या वाट्याला दर वेळी दोन जागा मिळतात. या वेळीही दोन जागा मिळतील. यापैकी एका जागेवर पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लढावे, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. तर दुसऱ्या जागेवर प्रशांत परिचारक हे जो उमेदवार देतील, त्याच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर माजी आमदार प्रशांत परिचारक, राजकीय चाणक्य समजले जाणारे उमेश परिचारक आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांची बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीतील संपूर्ण तपशील समजू शकला नाही. मात्र राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
Source link
जिल्हा बँक निवडणूक:रणजितसिंह- जुन्या नेत्यांप्रमाणे घडी बसवू, परिचारक- पक्ष आदेशाचे पालन करणार!