![]()
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात एका कौटुंबिक वादातून मेहुण्याने 21 वर्षीय शालकाच्या गळ्यावर कटरने वार करून खून केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. महिन्याभरापासून माहेरी आलेल्या पत्नीला नांदायला पाठवा, या मागणीसाठीच्या बैठकीत हा वाद विकोपाला गेला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीसह त्याचे आई-वडील, भाऊ, काकू आणि चुलतभाऊ अशा सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सनी विनोद डोळे (वय 21, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत शालकाचे नाव आहे. सनीची बहीण चांदणी हिचा विवाह 5 वर्षांपूर्वी कंडारी (ता. भुसावळ) येथील पेंटर काम करणाऱ्या सूरज नारायण वानखेडे (वय 30) याच्याशी झाला होता, त्यांना 3 वर्षांची मुलगी आहे. कौटुंबिक वादातून सनीची बहीण चांदणी महिन्याभरापासून जळगाव येथील माहेरी राहत होती आणि ती घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेत होती. मध्यस्थांमार्फत सोमवारी दुपारी 1 वाजता सनीच्या घरी नांदण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मुलगा (सूरज वानखेडे) त्याचे आई-वडील, मोठा भाऊ, काकू आणि चुलतभाऊ यांच्यासह आला होता. चर्चेदरम्यान पती-पत्नीत जुन्या वादावरून पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी सूरजने शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने, सनीने त्याला घराबाहेर निघून जाण्यास सांगितले आणि तो स्वतः घराबाहेर पडला. याचा राग आल्याने सूरजने सनीच्या मागे जाऊन त्याच्या गळ्यावर कटरने कानापासून ते गळ्यापर्यंत सुमारे आठ सेंटीमीटर खोलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सनीला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मृत सनी हा दोन बहिणींचा एकुलتا एक भाऊ होता आणि दोन्ही बहिणींचे विवाह झाले आहेत. सनीच्या मृत्यूच्या घटनेने त्याच्या आईला तीव्र मानसिक धक्का पोहोचला असून, तिला जीएमसीत व पोलिस ठाण्यात वारंवार भोवळ येऊन शुद्ध हरपत होती. अखेर तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळ व जीएमसी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल सनी डोळे याच्या खून प्रकरणात त्याची आई विद्या डोळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मृताच्या मेहुण्याचे भाऊ पंकज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) व चुलत भाऊ निकेश मधुकर वानखेडे (रा. अयोध्यानगर, जळगाव) यांनी सनीला पकडून ठेवले, तर सूरज वानखेडे याने चाकूने वार करून जिवे मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच सासरे नारायण वानखेडे, सासू मंगला वानखेडे आणि चुलत सासू प्रमिला मधुकर वानखेडे यांनी मृताची आई, बहीण व आजीला मारहाण केल्याचेही नमूद केले आहे. त्यावरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून पूर्वनियोजित कट, आरोपीने आणले होते शस्त्र कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी जी बैठक बोलावली होती, त्यात सूरजने सनीच्या बहिणीला शिवीगाळ केली आणि ही रक्तरंजित घटना घडली. तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत येतानाच आरोपीने सोबत धारदार शस्त्र आणले होते. याचा अर्थ हा खून पूर्वनियोजित होता, हे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. मृताचा मेहुणा मारेकरी असून, त्याला घटनास्थळावरून धारदार शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सहा जणांना अटक केली असून, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित संशयितांचा गुन्ह्यात काय सहभाग आहे, याची चौकशी सुरू असल्याचे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांनी सांगितले. मेहुण्याने पाठीमागून वार केला: मित्र घटना घडली तेव्हा मी सनीसोबतच होतो. घरात बैठक सुरू असताना जोरजोरात शिवीगाळ केल्याचे ऐकू आले. त्यानंतर सनी बाहेर आला. त्याच्या पाठीमागून धावत येत मेहुण्याने खिशातून कटर काढून त्याच्या कानापासून मानेपर्यंत जोरात वार केला. अनपेक्षितपणे झालेल्या हल्ल्याने सनी जागीच कोसळला. त्याच्या गळ्याच्या नसांमधून रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. हे पाहून सनीची बहीण, आई, आजी व मी त्याच्या गळ्याला कापड गुंडाळून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, असे सनीचा जवळचा मित्र आदित्य साळुंखेने सांगितले.
Source link
पत्नीला नांदायला पाठवण्याच्या कारणावरून वाद:जळगावात मेहुण्याने शालकाची केली हत्या, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल