![]()
मंदिरात दर्शन घेऊन निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी परिसरात राहायला आहेत. ते दररोज धनकवडीतील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात. ते नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले. दुपारी मंदिरातून दर्शन घेऊन निघालेल्या तक्रारदाराला चोरट्यांनी अडविले. ‘मंदिरासाठी आम्हाला पाच हजार रुपयांची देणगी द्यायची आहे. तुमच्याकडील सोन्याची अंगठी आम्हाला द्या. ही अंगठी आम्ही देणगीपोटी देण्यात आलेल्या रक्कमेला लावणार आहोत. आत्मशुद्धीकरणासाठी अंगठी हवी आहे‘, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांंनी अंगठी घेतली. चोरट्यांनी कागदात अंगठी बांधून देण्याचा बहाणा केला. अंगठीऐवजी चोरट्यांनी कागदात दगड ठेवला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ज्येष्ठ नागरिकाने काही वेळानंतर चोरट्यांनी दिलेला कागदाची पुडी उघडून पाहिली. तेव्हा कागदात छोटा दगड ठेवल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार एस तडवी तपास करत आहेत. वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सहकारनगर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विश्वनाथ महादू शिरसाठ (वय ५१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत शिरसाठ यांचा पुतण्या मंगेश शेखर कसबे (वय ४३, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास शिरसाठ हे सहकारनगर क्रमांक दोन परिसरातून निघाले होते. पाटे संस्कृती इमारतीजवळील रस्त्याने ते निघाले होते. त्या वेळी अंधारात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर पादचारी शिरसाठ यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या शिरसाठ यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक एन राऊत तपास करत आहेत.
Source link
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला गंडा:धनकवडीत चलाखीने 50 हजारांची सोन्याची अंगठी चोरली